कोरोना काळात विद्यार्थ्यांना मिळेना ‘स्वाधार’चा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:50+5:302021-09-19T04:19:50+5:30
संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे अद्याप बंद असल्याने, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब ...
संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे अद्याप बंद असल्याने, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गतवर्षीपासून बंद आहे. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांना ‘स्वाधार ’ योजनेचा आधार मिळत नसल्याने, अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया केव्हा सुरु होणार, याची जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
इयत्ता अकरावी ते पुढील उच्चशिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत ‘भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना निवास, भोजन भत्त्यासह शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी प्रतिवर्ष ४३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. ही अर्थसहाय्याची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे अद्याप बंद असल्याने २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षीच्या शैक्षणिक सत्रात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अद्याप बंद आहे. त्यामुळे कोरोना काळात गतवर्षीपासून विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा आधार मिळत नसल्याची स्थिती आहे. त्या अनुषंगाने ‘स्वाधार’ योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया समाजकल्याण विभागामार्फत केव्हा सुरु होणार, याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
समाजकल्याण आयुक्त, प्रादेशिक उपायुक्तांकडून मागवले मार्गदर्शन!
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यासंदर्भात समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत समाजकल्याण विभागाचे आयुक्त आणि अमरावती विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
.............................................
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे अद्याप बंद असून, स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याबाबत समाजकल्याण विभागाकडून निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. अर्ज स्वीकारण्यासंदर्भात समाजकल्याण विभागाचे आयुक्त व प्रादेशिक उपायुक्तांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
-पियुष चव्हाण
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.