विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच मिळणार पाठ्यपुस्तके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:42 PM2019-06-11T12:42:26+5:302019-06-11T12:42:52+5:30
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करून त्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहणार आहे.
अकोला: राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी २६ जून रोजी जिल्ह्यातील शाळा उघडण्यात येणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करून त्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार विद्यार्थ्यांसाठी ९ लाख ७२ हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याचा मानस आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि शासकीय, अनुदानित, शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली होती. त्यानुसार बालभारतीकडून ९ लाख २२ हजार पाठ्यपुस्तकांचा पुरवठा शालेय शिक्षण विभागाला करण्यात आला आहे. पुस्तकांचा साठा प्राप्त झाला असून, पंचायत समिती स्तरावर लवकरच पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतील. २२ जूनपर्यंत शाळांना १00 टक्के पाठ्यपुस्तके वितरित करण्याचे नियोजन समग्र शिक्षा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. (प्रतिनिधी)
शालेय गणवेशाच्या निधीसाठी प्रतीक्षा!
शासनाने आता शालेय गणवेश देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना कापड खरेदीचे अधिकार दिले आहेत. शासनाकडून देण्यात आलेल्या निधीतून हे कापड खरेदी करावे लागणार आहे; परंतु अद्याप शासनाने गणवेशासाठी निधी दिलेला नाही. २६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने, गणवेशासाठी निधी मिळाला असता तर शाळा व्यवस्थापन समित्यांनी गणवेशासाठी कापड खरेदी करून विद्यार्थ्यांचे मोजमाप करून ते कापड टेलर्सकडे शिवायला दिले असते आणि शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसोबतच गणवेशसुद्धा मिळाला असता; परंतु गणवेशाच्या निधीसाठी शिक्षण विभागाला प्रतीक्षा करावी लागत आहे.