रस्त्यासाठी पिवंदळच्या विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 02:14 PM2020-01-03T14:14:43+5:302020-01-03T14:14:58+5:30
रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करीत पिवंदळ खुर्द येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ खुर्द ते नांदखेड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून जाणे-येणे करणे अवघड झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करीत पिवंदळ खुर्द येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनात दिला आहे.
अकोट-तेल्हारा सीमेवर असलेल्या पिवंदळ खुर्द ते नांदखेडपर्यंतचा रस्ता पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, गत कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना या रस्त्यावरून जाणे-येणे करणे अवघड झाले आहे. इयत्ता पाचवीवरील शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना नांदखेड, चोहोट्टा, अकोट व अकोला येथे येणे-जाणे करावे लागते; मात्र पिवंदळ खुर्द ते नांदखेड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून पायदळ चालणेही अवघड झाले आहे.
त्यामुळे पिवंदळ खुर्द ते नांदखेड या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी पिवंदळ खुर्द येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही पिवंदळ खुर्द येथील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी श्रीकृष्ण चौके, विठ्ठल मुंडाले, ओम बघे, दर्शन बिलेवार, डिगांबर बिलेवार, अनिष बिलेवार, ओमप्रकाश नंदाणे, शुभम भोंगरे, वैशाली बघे, नंदिनी बघे, रत्ना बिलेवार, वैष्णवी तळोकार, कोमल भगेवार, दुर्गा बघे, योगिता बघे, अश्विनी बघे, वैष्णवी भोंगरे, प्रतीक्षा नंदाणे आदी विद्यार्थी-विद्यार्थिनींसह विठ्ठल तळोकार, काशीनाथ बिलेवार, आनंदा बघे, रघुनाथ शिरकटे, गजानन बिलेवार यांच्यासह इतर ग्रामस्थ होते.
पिवंदळ खुर्द ते नांदखेड रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पिवंदळ खुर्द येथील ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत.
-विठ्ठल तळोकार,
अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, पिवंदळ खुर्द.