विद्यार्थ्यांनो विज्ञानाची कास धरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2015 02:01 AM2015-12-30T02:01:09+5:302015-12-30T02:01:09+5:30
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ; एम. देवेंदर सिंह यांचे आवाहन.
अकोला/वाडेगाव : आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. या काळात टिकायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मंगळवारी केले. राज्य विज्ञान शिक्षण संस्था (नागपूर), जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आणि सस्ती येथील स.ल. शिंदे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पातूर तालुक्यातील स.ल. शिंदे विद्यालय व श्री. दिनकर पाठक कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ४१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मधुकर वाकचवरे होते. उद्घाटन एम. देवेंदर सिंह यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, गटविकास अधिकारी मुकुंद मुरकुटे, पातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरुण मुंदडा, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरुण शेगोकार, प्राचार्य विनोद मेश्राम यांची उपस्थिती होती. आधुनिक युगात विज्ञान व तंत्रज्ञान कसे सरस ठरणार आहे, याबाबत एम. देवेंदर सिंह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रकाश मुकुंद, सूत्रसंचालन नितीन काळे व आभार प्रदर्शन अरूण शेगोकार यांनी केले. कार्यक्रमासाठी राज्यस्तरीय विज्ञान परीक्षक रवींद्र भासकर, तालुका अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष सुनील वावगे, एम.डी. कापडे, व्ही.एन. काळपांडे, अनिल भारसाकळे, सी.जे. राजनकर, संतोष राठोड, सचिन वाकचवरे, पी.व्ही. देशपांडे, एस. बी. खंडारे आदींनी सहकार्य केले. विज्ञान प्रदर्शनासाठी एन.सी.ई.आर.टी. (नवी दिल्ली) मार्फत यंदा 'समावेशित विकासासाठी विज्ञान व गणित' हा मुख्य विषय ठरविण्यात आला आहे. विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण ३१ डिसेंबर रोजी होणार आहे.
***प्रदर्शनात १२0 विज्ञान प्रतिकृती
तालुकास्तरीय प्रदर्शनातून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी पात्र ठरलेल्या विज्ञान प्रतिकृती जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या गटात ४0, इयत्ता नववी ते बारावीच्या गटात ४0 आणि शिक्षकांच्या गटात ४0 अशा एकूण १२0 प्रतिकृतींचा समावेश आहे. राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी या तिन्ही गटांतून प्रत्येकी तीन आणि लोकसंख्या शिक्षणाच्या दोन अशा एकूण ११ प्रतिकृतींची निवड करण्यात येणार आहे.