पाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत!
By Admin | Published: July 15, 2017 01:19 AM2017-07-15T01:19:46+5:302017-07-15T01:19:46+5:30
मूर्तिजापूर : पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.
गणेश मापारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : गाव आदर्श... गावातील शाळाही डिजिटल; मात्र पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.
कोळंबी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक व माध्यमिक शाळा राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने अपघाताच्या भीतीमुळे ही शाळा इतरत्र हलविण्याची मागणी पालकांनी केली. त्यामुळे गावापासून एक कि.मी. अंतरावर शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. शाळेतच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या आवारातच कूपनलिका (बोअर) करण्यात आली; परंतु पाणीच न लागल्याने ही बोअर ‘फेल’ गेली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला; मात्र सर्व शिक्षा अभियानांतर्गत बोअर करण्यात आल्याने पाण्यासाठी दुसरी कोणतीही योजना शाळेसाठी देण्यात येणार नसल्याची भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेतली. स्थानिक ग्रामपंचायतनेही शाळेत पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, विद्यार्थी व शिक्षकांना दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहाराचे वाटप करावे लागते. त्यामुळे आहार तयार करण्यासाठी शाळेत येताच विद्यार्थ्यांना पाण्याची सोय करावी लागते.
शाळेपासून थोड्या अंतरावर खांबोरा पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन टाकली आहे. या योजनेच्या लिकेजमधून विद्यार्थी दररोज पाणी आणतात. विशेष म्हणजे, पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तारांच्या कुंपणातून मार्ग काढावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असली, तरी शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतीचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
गुरुजींचीही पायपीट
शालेय पोषण आहार नियमित तयार करावा लागत असल्याने गुरुजींनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यापूर्वी अनेक महिने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याची सोय करण्यातच शिक्षकांचा बराच वेळ जात असल्याचे येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले आहे. आजही विद्यार्थी आणि शिक्षक दररोज सोबतच शाळेत पाणी आणण्याचे काम करीत आहेत.
शाळेतच पाण्याची सोय असावी, यासाठी ग्रामपंचायत आणि वरिष्ठ कार्यालयांकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. शाळेत पाणी नसल्याने नाइलाजास्तव विद्यार्थी व शिक्षकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागती.
- नितीन बंडावार,
प्रभारी मुख्याध्यापक, जि. प. शाळा, कोळंबी.