चिमुकल्या हातांनी बनविली ईको फ्रेन्डली धूप-अगरबत्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:59 PM2018-11-11T13:59:59+5:302018-11-11T14:02:07+5:30
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गायीच्या शेणाचा वापर करून ईको फ्रेन्डली धूप-अगरबत्ती बनविली आहे. या चिमुकल्यांनी बनविलेल्या धूप-अगरबत्तीमुळे जिल्ह्याचे लक्ष वेधल्या गेले आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्या मनावर व्यावहारिक संस्कार झाले पाहिजे. अभ्यासासोबतच त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून येथील पातूर तालुक्यातील विवरा येथील जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळेतील शिक्षक दर शनिवारी दप्तराविना शाळा उपक्रम राबवितात. या उपक्रमांतर्गत शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गायीच्या शेणाचा वापर करून ईको फ्रेन्डली धूप-अगरबत्ती बनविली आहे. या चिमुकल्यांनी बनविलेल्या धूप-अगरबत्तीमुळे जिल्ह्याचे लक्ष वेधल्या गेले आहे.
पातूर तालुक्यातील विवरा हे छोटंसं गाव. गावामध्ये जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा क्र. एक आहे. इयत्ता पहिली ते चौथी ही शाळा आहे. या शाळेमध्ये मुख्याध्यापक संजय इंगळे यांच्यासह बलराज राठोड, ज्योती दांडगे, सुदेशना पजई हे शिक्षक काम करतात. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान द्यावे, शिक्षणामध्ये ज्ञानरचनावादाचा उपयोग करावा, ही दूरदृष्टी ठेवून या शिक्षकांनी दर शनिवारी दप्तरविना शाळा उपक्रम सुरू केला. शनिवारी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी दप्तर, पुस्तके न आणता, व्यावहारिक ज्ञान प्राप्त करावे, यासाठी गावातून गायींचे शेण गोळा करून ईको फ्रेन्डली धूप-अगरबत्ती निर्मिती सुरू केली. शाळेतील मुले गावातील गायींचे शेण गोळा करून दर शनिवारी शिक्षकांसोबत पूर्णत: नैसर्गिक धूप-अगरबत्ती तयार करतात. गायीच्या शेणामध्ये राळ, कापूर आणि सुगंधित द्रव्याचा वापर करून ही धूप-अगरबत्ती तयार केली जाते. आतापर्यंत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ५00 च्यावर धूप-अगरबत्तींची निर्मिती केली आहे. या धूप-अगरबत्ती गावकºयांना देण्यात येतात. येत्या काही दिवसांमध्ये या धूर-अगरबत्तींना उत्तम आकार देऊन आकर्षक पॅकिंग करून त्याची बाजारपेठेत विक्री करण्याचा शाळेचा मानस आहे. धूप-अगरबत्तीच्या विक्रीतून आलेल्या पैशांमधून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागविण्यासोबतच शाळेतील मूलभूत गरजासुद्धा पूर्ण करण्याचा मानस आहे.
दोन वर्षांपूर्वी कॉन्व्हेंटची उभारणी
गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे, या हेतूने जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळेने गावातच दोन वर्षांपूर्वी कॉन्व्हेंट सुरू केली. या कॉन्व्हेंटमध्ये सध्या ६७ विद्यार्थी शिक्षण घेतात. विशेष म्हणजे, या कॉन्व्हेंटमध्ये गावातीलच बेरोजगार उच्च शिक्षित युवती मानधनावर शिक्षिका म्हणून काम करतात, तसेच गावकºयांसह शिक्षकांनी १ लाख २३ हजार लोकवर्गणी करून संपूर्ण शाळा डिजिटल केली.
ईको फ्रेन्डली मच्छर अगरबत्तीसुद्धा बनविणार!
मच्छरांना पळविण्यासाठी नागरिक घातक रासायनिकांचा वापर करून बनविलेल्या मच्छर अगरबत्ती, लिक्विडचा वापर करतात. या रासायनिक अगरबत्तीपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी शाळेतील चिमुकले हात आता ईको फ्रेन्डली मच्छर अगरबत्ती बनविणार आहेत. या अगरबत्तीमध्ये तुळशी, कडूनिंबाच्या पानांचा वापर केला जाणार आहे.