विज्ञानदिनी बालवैज्ञानिकांचे आविष्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:31 PM2020-02-29T12:31:12+5:302020-02-29T12:35:19+5:30
विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक आविष्कार सादर करून त्याचे प्रदर्शन परिसरात मांडले.
अकोला: रणपिसे नगर परिसरातील श्री समर्थ पब्लिक स्कूलच्यावतीने शुक्रवारी मोठ्या उत्साहात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या दिनावर विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक आविष्कार सादर करून त्याचे प्रदर्शन परिसरात मांडले. टाकाऊ वस्तूपासून फरशी पुसण्याच्या यंत्रापासून तर जंक फूडचा वापर आरोग्यावर कसा हानिकारक आहे, याचे विदारक चित्रण दाखविणारा आविष्कारपर्यंत अनेक आविष्कार विद्यार्थ्यांनी यावेळी प्रदर्शनात मांडले.
श्री समर्थ पब्लिक स्कूल संस्थेचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांच्या अध्यक्षतेत व मान्यवरांच्या उपस्थितीत या विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनात समृद्धी बाठे, पल्लवी सोळंके, भक्ती सावरकर यांनी आकाशगंगाची विज्ञान प्रतिकृती सादर केली. श्याम खोजा, पवन निलखन, तनीष राजूरकर यांनी धूळ नियंत्रक यंत्र तयार करून कल्पकता दाखविली. अमन नागळे, कृष्णा इंगळे, अनिरुद्ध जळगावकर यांनी अग्निरोधक यंत्र तर श्रेयस वाघमारे, प्रफुल्ल फुलारी, श्रेयस हिंगणकर, चैतन्य बोर्डे यांनी शाश्वत व आधुनिक शेती कशी करावी, याची प्रतिकृती मांडली. विज्ञान प्रदर्शनात अनुष्का साखरकार, देवयानी मोरे यांनी ग्रहांची बाह्य रचना व अंतर्रचना याची प्रतिकृती सादर केली. ज्वालामुखीपासून दगडांची निर्मिती कशी झाली, याविषयी प्रतिकृतीतून नैनसी मिश्रा, आरती पायघन यांनी माहिती मांडली. स्वराज्य जायले, शिवराज गावंडे यांनी भूकंप सूचक यंत्र बनविले. आवाज करणारी बंदूक सोहम ढोणे, श्रीनिवास साठे यांनी तयार केली. गुरुत्वाकर्षण सिद्धांत सुयश लोहोते, तन्मय चतरकार यांनी सादर केला. विद्यार्थ्यांच्या कल्पक व आधुनिक विज्ञानाच्या आविष्काराने पालक, शिक्षकसुद्घा प्रभावित झाले.
आकाश, ओमने बनविले फरशी पुसण्याचे यंत्र!
समर्थचा विद्यार्थी आकाश बनसोडे, ओम सानप यांनी घरामध्ये फरशी फुसताना आईला त्रास होता. कंबर दुखते, यावर काय उपाय करावा, या कल्पनेतून त्यांनी टाकाऊ वस्तूपासून फरशी पुसण्याचे यंत्र बनविले. त्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा त्यांनी कल्पकतेने वापर केला. हे यंत्र टीव्ही, संगणक आदींच्या स्वच्छतेसाठी वापरू शकतो. याचे प्रात्यक्षिक दोघांनी सादर केले. एवढेच नाही, तर संस्कृती सानप, सिद्धी खान्देझोड व अर्पिता देशमुख या विद्यार्थिनींनी जंक फूड सेवनाचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, पाकीटबंद पदार्थ आरोग्यास कशी हानी पोहोचवतात, याचे प्रात्यक्षिक सादर केले. आम्लपित्त निवारण करणाऱ्या इनोसारख्या औषधाचा पाण्यात तळलेले पाकीटबंध पदार्थ टाकून प्रयोग केला, तर त्यामधील अपायकारक पदार्थ वेगळे होत असल्याची प्रतिकृतीही या विद्यार्थिनींनी सादर केली. त्यांचे संस्थाध्यक्ष प्रा. नितीन बाठे, जयश्री बाठे व प्राचार्य रिता घोरपडे यांनी कौतुक केले.