पटसंख्या घसरणार : शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:16 AM2020-05-24T10:16:46+5:302020-05-24T10:16:59+5:30
शाळांमधील पटसंख्या घसरणार असल्याची भीती असल्याने, शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरण्याचा धोका वाढला आहे.
- नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. जिल्ह्यातील एमआयडीसी, उद्योगधंद्यांच्या ठिकाणी स्थायिक झालेले मजूर कुटुंबासह त्यांच्या गावी परतत आहेत. त्याचा परिणाम जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांसह खासगी शाळांवर होणार आहे. शाळांमधील पटसंख्या घसरणार असल्याची भीती असल्याने, शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरण्याचा धोका वाढला आहे.
कोरोना संकटामुळे अनेक रोजगार, उद्योगधंदे बंद पडले आहेत. एमआयडीसीतील कारखाने बंद, डाळ गिरणी उद्योग बंद पडला आहे. यासोबतच इतर किरकोळ व्यवसायसुद्धा बंद पडले आहेत. हाताला काम नसल्यामुळे हजारो मजूर कुटुंबासह आपल्या गावी परतत आहेत. हजारो मजूर उद्योगधंद्यानिमित्त अकोल्यात आले होते. कामधंद्यानिमित्त मजूर वर्ग अकोल्यात स्थायिक झाला होता. मुलांना शाळेत घातले होते; परंतु कोरोनामुळे सर्वांच्या हातचा रोजगार हिरावल्या गेला. बेरोजगार झालेल्या मजुरांनी मुलाबाळांसह घरचा रस्ता पकडला आहे. त्यामुळे साहजिकच शाळांमधील पटसंख्या घसरणार आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असल्याने, त्यांच्या शिक्षणाबरोबरच अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या निमित्ताने अकोल्यात स्थायिक झालेले मजूर, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये परतले आहेत. या मजुरांची मुले प्रामुख्याने जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत होती. मजुरांबरोबर त्यांची मुलेही परत गेली आहेत. त्यामुळे मराठी, हिंदी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्याही कमी होण्याची शक्यता आहे.
मजूर, त्यांची मुले परत येण्याविषयी साशंकता!
विद्यार्थी संख्येच्या आधारावर शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली जाते. विद्यार्थीच नाहीत तर शिकविणार कोणाला? त्यामुळे शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका वाढला आहे.
प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात रोजगारासाठी आलेले मजूर, कामगारांची मुले हिंदी, मराठी व सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यमांच्या जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांसोबतच अनुदानित खासगी शाळांमध्ये शिक्षण घेतात.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हजारो मजूर त्यांच्या गावी परत जात आहेत. त्यातील किती मजूर व त्यांची मुले परत येतील. याविषयी साशंकता आहे.
जिल्हा परिषद शाळांसोबतच खासगी अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर, कामगारांची मुले शिक्षण घेतात; परंतु कोरोनामुळे मजूर, कामगार स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे अनेक शाळांमधील पटसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, प्राथमिक