२७ शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून अनुभवले विज्ञान; विज्ञान संस्कार शिबिराचा समारोप
By रवी दामोदर | Published: April 20, 2024 05:30 PM2024-04-20T17:30:43+5:302024-04-20T17:32:11+5:30
सहा दिवसीय कार्यशाळेत गिरविले धडे.
रवी दामोदर, अकोला : विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाच्या अकोला शाखेतर्फे सोमवार, दि. १५ एप्रिलपासून सुरु झालेल्या ‘विज्ञान संस्कार शिबिर’ या सहा दिवसीय कार्यशाळेचा समारोप शनिवार, २० एप्रिल रोजी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी),११ महाराष्ट्र बटालियनच्या कार्यालयात करण्यात आला. कार्यशाळेत अकोल्यातील २७ विविध शाळांमधील ५४ विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रात्यक्षिकातून अनुभवले.
शिबिरात पहिल्या दिवशी, न्यू इंग्लिश स्कूल, अकोला येथे डॉ. नितीन ओक यांनी "लाईट ऑन लाईट" या सत्राचे आयोजन केले होते. वैजयंती पाठक यांनी दुसऱ्या दिवशी "दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र" या विषयावरील सत्राचे नेतृत्व केले, डॉ. मोनिका देशमुख यांच्या मार्गदर्शनात डॉ. हेडगेवार रक्त केंद्राला भेट देणे हे कार्यशाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
चौथ्या दिवशी श्री. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत प्रा. कुशल सेनाड यांचे "सूक्ष्मजीवशास्त्राचा परिचय" या विषयावर सत्र झाले. पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील जैवतंत्रज्ञान प्रयोग शाळेला भेट दिली. तेथे डॉ. मंगेश मोहरील आणि त्यांच्या चमूने कृत्रिम बिया तयार करणे, डीएनए काढणे आणि नॅनोपार्टिकल्स वेगळे करणे यासारखे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. शिबिराच्या समारोप २० एप्रिल रोजी एनसीसी कार्यालयाला भेट देऊन झाला.
विज्ञान शिक्षक ओझरकर यांनी शस्त्र वापरण्याची गरज आणि शस्त्र निर्मितीची सुरुवात कशी आणि कुठवर झाली याबद्दल माहिती दिली . ले. कर्नल सी. पी. भदोला यांच्या देखरेखीखाली शारीरिक क्षमतांचा कस लावणारे प्रात्यक्षिक आणि रायफल चालवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. समारोप सत्राला डॉ. व्ही.डी. देवतळे, डॉ. मीनल सोमण, पाठक, डॉ. पिंपरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.