विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करा ‘इझी टेस्ट अॅप’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 02:42 PM2020-01-05T14:42:34+5:302020-01-05T14:42:43+5:30
हे अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह शाळांना लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.
अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आॅनलाइन ‘इझी टेस्ट अॅप’ उपलब्ध करून दिले आहे. हे अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह शाळांना लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.
तंत्रज्ञानाचे युग आहे आणि सर्वत्र स्मार्ट मोबाइल फोनचा वापर वाढला आहे. त्यामुळे आॅनलाइन कलमापन चाचणीसुद्धा मोबाइलवर घेण्यात येत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेला घेऊन पालकही गंभीर आहेत. पाल्यांना परीक्षेत चांगले यश मिळावे, यासाठी पालक खासगी शिकवणी वर्ग विद्यार्थ्यांना लावून देतात. आता शिक्षण विभागानेसुद्धा त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि परीक्षेचा सराव व्हावा, शिष्यवृत्ती परीक्षेला शाळांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट व्हावेत, पालकांमध्येसुद्धा जागृती व्हावी, या उद्देशाने माध्यमिक शिक्षण विभागाने आॅनलाइन ‘इझी टेस्ट अॅप’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीसुद्धा याच अॅपच्या माध्यमातून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घटक चाचणी घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज रात्री ८ वाजता एका विषयावर आॅनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परीक्षेपर्यंत प्रत्येक रविवारी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सराव पेपर या अॅपवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. संबंधित शिक्षक व पालकांनी आपल्या मोबाइलवर इझी टेस्ट अॅप डाउनलोड करून विद्यार्थ्यांकडून पेपर सोडवून घ्यावेत, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले आहे.
गतवर्षी इझी अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा आणि अभ्यास मार्गदर्शनाचा उपक्रम राबविला होता. यंदासुद्धा इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी इझी टेस्ट अॅपद्वारे आॅनलाइन व्हिडिओ, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, सराव पेपर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थी व पालकांनी त्याचा लाभ घ्यावा.
-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.