विद्यार्थ्यांनी वाचले हिरव्यागार निसर्गाचे पुस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:18 AM2021-02-10T04:18:21+5:302021-02-10T04:18:21+5:30
निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरू, सखा, बंधू, मायबाप त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप असं निसर्ग वर्णन पाठ्यपुस्तकांच्या ...
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू, सखा, बंधू, मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप
असं निसर्ग वर्णन पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून चार भिंतीच्या आड शाळेत विद्यार्थी नेहमी शिकतात. निसर्गाचं औदार्य आणि सौंदर्य विद्यार्थ्यांना उमजावं या हेतूने निसर्गयात्रा उपक्रम तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळाच्या वतीने सोमवारी राबविण्यात आला. उपक्रमात सहभागी होत हिरव्यागार निसर्गाचे पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचन करीत प्रत्यक्ष अनुभूतीतून निसर्गाचे शिक्षण घेतले.
निसर्गाच्या सोबतीने पाठ्यपुस्तकातील भाषा, गणित, विज्ञान, भूगोल विषयातील घटकांची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून शाळेच्या वतीने निसर्गयात्रा हा उपक्रम राबविण्यात आला. पाठ्यपुस्तकातील निसर्ग आधारित कविता, पाना-फुलांच्या संगतीने गणितातील संबोध, निसर्गाचे विज्ञान व परिसराचा भूगोल, मातीचे प्रकार, पिकांची ओळख, औषधी वनस्पती ह्या विविध घटकांची माहिती शिक्षकांद्वारे प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना अनुभवता आली.
शेतकरी व शेतमजुरांचे आपल्या आयुष्यातील योगदान व श्रम करणाऱ्यांबद्दल स्नेहभाव जपण्याचे आवाहन निसर्ग यात्रेतील अतिथी संवादक अरुण निमकर्डे, उमेश तिडके यांनी विद्यार्थ्यांना केले. निसर्गयात्रा उपक्रमाचे प्रमुख अध्यापक तुलसीदास खिरोडकार यांनी इयत्ता पाचवी ते सातवीच्या निसर्ग कवितांचे गायन व भावार्थ विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितला. विज्ञान शिक्षक गोपाल मोहे यांनी निसर्ग विज्ञानाबाबत तर निखिल गिऱ्हे यांनी परिसराची भौगोलिक माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या खंडाळा शिवारातील संत्रा, केळी, पपई, हळद, आंबा पिकांसोबतच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भुईमूग पिकांची ओळख शिक्षणप्रेमी दिनकर धूळ, राजेंद्र दिवनाले यांनी करून दिली. निसर्गयात्रा उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, सुरेखा हागे, राजू-मीना मंच प्रतिनिधी, महाराणा प्रताप स्काउट पथक यांनी पुढाकार घेतला.
फोटो:
पाठ्यपुस्तकातील घटकांचा समन्वय साधत प्रत्यक्ष शैक्षणिक अनुभूती नैसर्गिक वातावरणात मिळाल्याने हे ज्ञान चिरकाल टिकणारे राहील. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव आनंददायी वाटला.
तुलसीदास खिरोडकार, उपक्रम प्रमुख निसर्गयात्रा