जेवण व नाश्ता समजून विद्यार्थी करतात अभ्यास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:23 AM2021-08-27T04:23:17+5:302021-08-27T04:23:17+5:30
शाळा बंद असल्याने ऑफलाइन शिक्षण देण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी स्थानिक शिक्षकांनी रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रोण, पत्रावळी, ...
शाळा बंद असल्याने ऑफलाइन शिक्षण देण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी स्थानिक शिक्षकांनी रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रोण, पत्रावळी, कागदी प्लेट वर इयत्ता एक ते सातच्या अभ्यासाचे लेखन करून विद्यार्थ्यांना अभ्यास जेवण व नाश्ता रूपात उपलब्ध करून दिला आहे.
पुस्तकातील आशय, स्वाध्याय पत्रावळीवर लेखन करून खंडाळा येथील शिक्षकांनी वेगळ्या पद्धतीने अभ्यासाची आवड विद्यार्थ्यांत ज्ञानाहार रेस्टॉरंट उपक्रमातून निर्माण केली आहे. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात असंख्य अडथळे येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी शाळेच्या वतीने आतापर्यंत रेडिओ खंडाळा, स्वाध्यायमाला, निसर्गयात्रा, ऑनलाइन टेस्ट, मोहल्ला शाळा असे उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राबविले. ज्ञानाहार रेस्टॉरंट तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ सदस्य दिनकर धूळ यांनी जागा उपलब्ध करून दिली. तेथून विद्यार्थी ज्ञानाहार घेऊन घरी अभ्यास करतात.
गणितीय क्रिया, भाषा व्याकरण, इंग्रजी, विज्ञान, भौगोलिक माहिती, इतिहास विषयासंबंधी सोप्याकडून कठिणाकडे जाणाऱ्या स्वाध्याय कृती ज्ञानाहार रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासह अभ्यासपूरक वाचनीय पुस्तके येथे ठेवण्यात आली आहेत. ज्याचा उपयोग गृहकार्य करण्यासाठी विद्यार्थी आवडीने करीत आहेत.
कोविड संसर्ग नियम लक्षात घेऊन केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैला खंडेराव, उपाध्यक्ष प्रशांत आंबूसकर, शिक्षणतज्ज्ञ दिनकर धूळ, सदस्य संतोष वैतकार यांच्या सहकार्याने गावातील विद्यार्थी आनंदाने अध्ययनरत राहावे यासाठी ज्ञानरचनावादी पद्धतीने सुरू केलेल्या
ज्ञानाहार रेस्टॉरंट उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार, राजेंद्र दिवनाले, सुरेखा हागे, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे यांचे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी कौतुक केले आहे.
फोटो:
नियमित शिकण्याच्या साहित्यासोबत वेगळी शैक्षणिक साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यास ते आनंदाने अभ्यास करतात. या अनुभवातून ज्ञानाहार रेस्टॉरंट सुरू केले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-तुलसीदास खिरोडकार
प्रयोगशील शिक्षक, खंडाळा