कोरोना काळातही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बोलाविले शाळेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 10:37 AM2020-11-03T10:37:16+5:302020-11-03T10:40:25+5:30
Akola News पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या मुलांना शाळेत परीक्षेसाठी बोलावण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, तरी खबरदारी म्हणून अद्यापही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. असे असतानाही डाबकी रोड स्थित खंडेलवाल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शाळा सुरू न करता ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा घेण्याच्या सूचना आहेत. असे असतानाही, डाबकी रोड येथील खंडेलवाल इंग्लिश स्कूलने राज्य शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या मुलांना शाळेत परीक्षेसाठी बोलावण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे शाळेत आलेल्या पालकांच्या हाती अर्धवार्षिक शुल्कासाठी डिमांड नोट देण्यात आली. यावेळी ज्या पालकांनी विद्यार्थ्यांचे अर्ध वार्षिक शुल्क भरण्यात आले आहे, अशा विद्यार्थ्यांना वर्गात बसून परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली. तर शाळेचे शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले. शाळेच्या आडमुठी वृत्तीवर पालकांनी नाराजी दर्शविली. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाला विचारणा केली असता, विद्यार्थ्यांना शाळेत परीक्षा देणे बंधनकारक केले नसल्याचे सांगण्यात आले.