पाठ्यपुस्तकाशिवाय विद्यार्थी घेतात शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:18 AM2021-09-13T04:18:36+5:302021-09-13T04:18:36+5:30
संतोषकुमार गवई पातूर : ज्या गावांमध्ये कोविड-१९चा रुग्ण नसल्यास, त्या गावातील शाळा वरिष्ठांच्या आदेशानुसार व शासन, स्थानिक प्रशासनाच्या मंजुरीनंतर ...
संतोषकुमार गवई
पातूर : ज्या गावांमध्ये कोविड-१९चा रुग्ण नसल्यास, त्या गावातील शाळा वरिष्ठांच्या आदेशानुसार व शासन, स्थानिक प्रशासनाच्या मंजुरीनंतर सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके दिली जातात. तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण करण्यात आले; मात्र दीड महिन्यांपासून पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर पडून आहेत. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला; परंतु अद्यापही विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याने विद्यार्थी पाठ्यपुस्तकाविनाच शिक्षणाचे धडे घेत आहेत. संबंधित विभागाच्या हलगर्जीमुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण बालभारती भांडार ते तालुकास्तरावरून केंद्र शाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे मे. शिरीष कार्गो सर्व्हिसेस प्रा. लि., मुंबई या खासगी संस्थेची वाहतूकदार म्हणून निवड करण्यात आली आहे. पुस्तकांची वाहतूक विहित कालमर्यादेत केंद्र शाळा स्तरावर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले; परंतु विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याचे चित्र आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाठ्यपुस्तके त्वरित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.
------------------------
१३ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
पातूर तालुक्यात १ ते ८ सुमारे १३ हजार विद्यार्थी संख्या आहे. एकूण १६९ शाळांपैकी १३२ शाळांना पुस्तके वितरित करायची आहेत. त्यापैकी ९९ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. वितरकाने पुस्तके तालुका स्तरावर आणून ठेवले आहेत; मात्र केंद्रनिहाय शाळेत पुस्तकांचे वितरण झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांमधून होत आहे.
------------------------------------
सेतू अभ्यासक्रम संपला आता पुढे काय?
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ४५ दिवसांचा वर्गनिहाय सेतू अभ्यासक्रम हा मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, चालू वर्षाच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाचे पूर्वतयारी व्हावी, या दृष्टीने सेतू अभ्यासक्रम तयार केला होता. दि. १५ ऑगस्टपर्यंत शिक्षकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केला. दि. १५ ऑगस्टपर्यंत पुस्तके मिळायला हवी होती, पुस्तके न मिळाल्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
------------------
तालुका स्तरावरील पुस्तके केंद्रनिहाय शाळांवर पोहोचविण्यासाठी जिल्हा स्तरावर कंत्राटदारांशी पाठपुरावा सुरू आहे.
- दीपमाला भटकर, विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, पंचायत समिती पातूर.
-----------------------
आमच्या मुलांना अद्यापही शाळेकडून पुस्तके मिळाली नाहीत. पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- नितीन पवार, पालक.
-----------------------------
कंत्राटदाराचे दुर्लक्ष
शासनाने कंत्राटदार वितरकामार्फत पाठविलेली पुस्तके शहरातील आरिफनगर शाळेत ठेवण्यात आली आहेत. पातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पुस्तके सार्टिंग करून ठेवली आहेत; मात्र, संबंधित कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे दिसून येत आहे.