विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत दिले जनता दरबारात पालकमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:52 PM2019-02-05T12:52:13+5:302019-02-05T12:52:47+5:30
अकोला: जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे जनतेच्या समस्या जाणून घेतात अन् त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात; पण सोमवारी चक्क वन्य प्राण्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याने सर्वच थक्क झाले.
अकोला: जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे जनतेच्या समस्या जाणून घेतात अन् त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात; पण सोमवारी चक्क वन्य प्राण्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याने सर्वच थक्क झाले. त्यांची समस्या होती ती जंगलातील पाणी टंचाई, चारा प्रश्न अन् रस्ते अपघात.
नेहमीप्रमाणे सोमवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली. आपल्या विविध समस्यांना घेऊन नागरिक पालकमंत्र्यांसमोर हजर झाले. त्यांची गºहाणे ऐकून त्या सोडविण्याची कार्यवाही सुरू झाली, तोच काही विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत या जनता दरबारात प्रवेश केला. त्यांच्या आगमनामुळे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. दुष्काळ आणि मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात राहणे अवघड झाले. दुष्काळी परिस्थितीत मानवी वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शहरातील पाळीव प्राण्यांसाठी योग्य अन्नाची सुविधा असते. गुरा-ढोरांसाठी चारा छावण्यासुद्धा शासनातर्फे चालविल्या जातात; परंतु याच काळात वन्य प्राण्यांचे जंगलात जगणे अवघड झाल्याची तक्रार यावेळी वन्य प्राण्यांनी केली. मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेली आमची निवासस्थाने अन्न, पाण्यासाठी सैरभैर फिरताना होणारे अपघात यासह इतर अन्यायाची गाºहाणी यावेळी वन्य प्राण्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांच्याकडे मांडली. यावेळी त्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व सभागृहातून परतीचा मार्ग धरला.
या विद्यार्थ्यांनी साकारली वन्य प्राण्यांची वेशभूषा
जानवी राठी, कृष्णा अटल, महक अग्रवाल, चिराग राठी, अथर्व लोखंडे या विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांची वेशभूषा साकारली होती. या प्रसंगी न्यू विदर्भ फाउंडेशनचे आदित्य दामले, ललित यावलकर, सतीश वानरे, राकेश शर्मा, सतीश फाले, विकास मोळके, सूरज पातोंड, सूरज टापरे, वैभव धुळे, श्रीकांत आमले, सौरभ भगत आणि रणजित राठोड यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.
या आहेत मागण्या
- कृत्रिम पाणवठ्यांद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
- मानवी अतिक्रमणापासून रक्षण करावे.
- अन्न पाण्यासाठी स्थलांतर करताना महामार्गावर होणारे वन्य प्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी उपयोजना कराव्यात.
- सुरक्षित अधिवासाची सोय करावी.
वन्य प्राण्यांनाही तारीखच मिळणार का?
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात येणाऱ्या अनेकांना तारखा दिल्या जातात; परंतु यंदा विद्यार्थी चक्क वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत दाखल झाले. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनादेखील तारीख दिली जाणार का, असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित होत आहे.