विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये मिळणार कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 02:43 PM2021-10-24T14:43:08+5:302021-10-24T14:46:35+5:30
Students will get Covid vaccine in colleges : शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने महाविद्यालयांमधील विशेष लसीकरण सत्रासाठी तारखा निश्चित केल्या जाणार आहेत
- अतुल जयस्वाल
अकोला : लसीकरण माेहिमेला आणखी गती देणे व सर्वाधिक सक्रिय असलेल्या वयोगटातील तरुणांना लसीकृत करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये येत्या सोमवार २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ‘मिशन युवा स्वास्थ’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महाविद्यालयांमध्ये लसीकरण सत्र आयोजित करून विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षापासून बंद असलेली महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, महाविद्यालयांमध्ये गर्दी वाढली आहे. या वयोगटातील विद्यार्थी वर्ग सर्वात सक्रिय असल्याने त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पूर्णपणे लसीकृत केले तर कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यास मोठा हातभार लागेल, या उद्देशाने राज्यभरात ‘मिशन युवा स्वास्थ’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पहिला किंवा ज्यांचा पहिला झाला असेल, त्यांना दुसरा डोस देण्यात येईल. तसेच लसीकरण न झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही या सत्रांमध्ये लस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची यादी मागविली आहे. शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने महाविद्यालयांमधील विशेष लसीकरण सत्रासाठी तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. यासाठी पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्यात येणार असून, एएनएम, परिचारिका, डॉक्टर्स आणि आंतरवासिता डॉक्टर लस देण्याची जबाबदारी सांभाळतील.
आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
आठवडाभर चालणाऱ्या या मोहिमेवर जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी तर महानगर पालिका पातळीवर आयुक्तांचे लक्ष राहणार आहे. मोहीम संपल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणारे महाविद्यालय, जिल्हा आणि विभागाचा गौरव आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे.
या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयांमध्ये विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. महाविद्यालयांच्या समन्वयाने राबविण्यात येणार असलेल्या मोहिमेत विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहिम, अकोला