विद्यार्थिनींना मिळणार ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 03:11 PM2019-11-02T15:11:27+5:302019-11-02T15:11:33+5:30
मोफत संगणक प्रशिक्षणांतर्गत ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे.
अकोला: जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील इयत्ता सातवी ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनी, महिलांना मोफत संगणक प्रशिक्षणांतर्गत ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण राबविण्याविषयी मार्गदर्शन करून इयत्ता सातवी ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनी व महिलांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळायला हवा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रशिक्षणासाठी १0 टक्के जिल्हा परिषद उपकर अंतर्गत निधी खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४00 विद्यार्थिनी, महिलांना मोफत ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण घेता येणार आहे. प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या किमान १0 वी उत्तीर्ण ग्रामीण भागातील मुलींची यादी तालुका तसेच महाविद्यालयनिहाय तयार करण्याचे निर्देशही ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव यांच्याकडे संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)