विषय शिक्षक अद्यापही कार्यरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:20 AM2020-05-18T10:20:00+5:302020-05-18T10:20:06+5:30
सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत विषय सहायक म्हणून प्रतिनियुक्ती दिल्याने ती रद्द करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी दिला. त्यानंतरही काही शिक्षक कार्यरत असून, त्यांना कार्यमुक्त न केल्यास शिक्षण हक्क अधिनियमातील कलम २७ नुसार शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार आहे. त्यामुळे सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले विषय सहायक, समुपदेशकांना गत अनेक वर्षांपासून तेथेच ठेवले जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेसह शासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या. त्यानुसार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला होता; मात्र कार्यवाही झाली नाही. त्यानंतर थेट राज्य शासनाकडेच तक्रारी झाल्याने शिक्षण संचालकांनी ३० एप्रिल रोजी त्यांच्या कार्यमुक्तीचा आदेश दिला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या विषय सहायक, समुपदेशकांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर रुजू करावे, यासाठी ३० एप्रिल रोजीच कार्यमुक्त करण्याचे बजावले. शिक्षण संचालकांनी त्यासोबत यादीही दिली. त्यामध्ये विषय सहायक गोपाल सुरे, दिनेश बोधनकर, जितेंद्र काठोळे, संदीप वरणकार, तृप्ती देशपांडे, निवृत्ती राऊत, शेख राजू शेख चांद, गणेश राऊत, भीमसिंग राठोड, समुपदेशक हेमंत पदमने व नीता जाधव यांचा समावेश आहे. त्यापैकी काही शिक्षकांना अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही. कार्यकारी समिती स्थापन करून त्यांच्या त्यामध्ये समावेश करण्यात आला. या प्रकाराने शिक्षण हक्क कायद्यातील कलम २७ नुसार तरतुदींचा भंग होत आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे अद्यापही कार्यरत शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी केली आहे.