५८३ पदांवर विषय शिक्षकांच्या नियुक्त्या गुरुवारपासून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 02:01 PM2018-12-23T14:01:25+5:302018-12-23T14:01:41+5:30
अकोला: गत काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या नियुक्त्यांविषयी प्राथमिक शिक्षण विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
अकोला: गत काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या नियुक्त्यांविषयी प्राथमिक शिक्षण विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. आता प्रभारी शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार दिनेश तरोळे यांच्याकडे सोपविल्यानंतर, त्यांनी ५८३ पदांवर विषय शिक्षकांच्या नियुक्त्या गुरुवारपासून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच पदवीधर शिक्षकांचे समुपदेशनाने समायोजन करून पदस्थापना देण्यात येणार आहे.
दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विषय शिक्षकांच्या नियुक्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात मंत्रालयात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षक समन्वय समितीची बैठक सुद्धा झाली होती. या बैठकीत ग्रामविकास मंत्र्यांनी विषय शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण विभागाला दिला होता. आॅनलाइन बदली प्रक्रियेच्या रॅण्डमायझेशन राउंडमधील अकोला जिल्हा परिषदेत शिक्षक बदली प्रक्रियेनंतर विषय शिक्षकांसाठी (पदवीधर शिक्षक) राखीव असलेल्या ५८३ पदांवर सहायक शिक्षकांना पदस्थापना करण्यात आले. ५८३ विषय शिक्षकांची रिक्त पदे प्राथमिक शिक्षकांतील पदवीधर शिक्षकांमधून भरण्याचे निर्देशसुद्धा दिले होते. त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने केवळ ८00 शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्या होत्या; परंतु पुढे काहीच झाले नाही. ८0 दिवस उलटूनही विषय शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात न आल्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; परंतु मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्याकडे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्याचे आदेश दिल्याने, तरोळे यांनी विषय शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियोजन केले आहे. २७ डिसेंबर रोजी ८ ते १0 च्या शिक्षकांमधील जे शिक्षक पदवीधर आहेत, त्यांचे समुपदेशन पद्धतीने समायोजन करून पदस्थापना देण्यात येणार आहे. तसेच २८ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान मराठी व उर्दू माध्यमांच्या शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून नियुक्त्या देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
पदवीधर शिक्षकांचे समुपदेशन पद्धतीने समायोजन करून पदस्थापना देण्यात येणार आहे. तसेच २८ डिसेंबरपासून मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या विषय शिक्षक म्हणून नियुक्त्या करण्यात येतील. त्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
- दिनेश तरोळे, प्रभारी शिक्षणाधिकारी, प्राथमिक