हाॅस्पीटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णांची दैनंदिन माहिती सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:19 AM2021-03-05T04:19:11+5:302021-03-05T04:19:11+5:30
जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात काेराेनाचा झपाट्याने प्रादूर्भाव झाल्याचे समाेर आले आहे. काेराेनावर मात करण्यासाठी लसीचे उत्पादन सुरु हाेताच नागरिकांच्या मनातून ...
जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात काेराेनाचा झपाट्याने प्रादूर्भाव झाल्याचे समाेर आले आहे. काेराेनावर मात करण्यासाठी लसीचे उत्पादन सुरु हाेताच नागरिकांच्या मनातून काेराेनाबद्दलची भिती दुर झाल्याचे दिसून आले. शिवाय सर्व प्रकारचे उद्याेग, व्यवहार पूर्ववत सुरु हाेऊन प्रवासाची साधने उपलब्ध झाली. लग्न समारंभ,विविध साेहळ्यांचे धडाक्यात आयाेजन हाेऊ लागल्याचे परिणाम समाेर आले आहेत. विदर्भात अकाेला,अमरावती,वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा काेराेनाने हाहाकार निर्माण केला आहे. महापालिका क्षेत्रातही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. नागरिकांमध्ये काेराेनाची लक्षणे असताना सुध्दा स्वॅब देण्याकडे पाठ फिरवून खासगी रुग्णालयांत परस्पर उपचार केले जात असल्याची बाब मनपाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये काेणत्याही आजारासाठी भरती केल्या जाणाऱ्या रुग्णांची दैनंदिन माहिती मनपाकडे सादर करण्याचा आदेश मनपाचे प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यांनी जारी केला आहे. या आदेशाचे रुग्णालयांकडून कितपत पालन हाेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डाॅ.पाठक यांच्याकडे जबाबदारी
खासगी रुग्णालयांत उपचारासाठी भरती करण्यात आलेले तसेच उपचारादरम्यान मृत पावलेल्या रूग्णांची संपुर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. अशा रुग्णांची यादी मनपाच्या वैद्यकीय आराेग्य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक यांच्या कक्षात सादर करण्याचे निर्देश आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांच्या विराेधात भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय/कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.