दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:59 PM2019-05-26T12:59:03+5:302019-05-26T12:59:17+5:30
अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
- संतोष येलकर
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया रखडली. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, खरीप हंगाम तोंडवर आला आहे. त्यानुषंगाने अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.
राज्यातील दुष्काळी भागातील ४० लाख शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्र्फत मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर मदतनिधी जिल्हानिहाय वितरित करण्यात आला; परंतु गत मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे राज्यात तालुका स्तरावर दुष्काळी मदतीचे वाटप थांबविण्यात आल्याने बहुतांश दुष्काळग्रस्त शेतकºयांना दुष्काळी मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, खरीप हंगामही तोंडावर आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत अडकलेली दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २४ मे रोजी केली आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.
‘पीएम किसान’ मदतीचाही शेतकऱ्यांना लाभ द्या!
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम-किसान) दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम काही शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यात ६० लाख लाभार्थी शेतकरी असून, सर्व लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात तीन हप्त्याची सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे पात्राद्वारे केल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.