रस्त्यालगतच्या बेवारस, भंगार वाहनांची माहिती सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:52+5:302021-07-29T04:19:52+5:30
शहराच्या विविध भागात बेवारस तसेच भंगार वाहने दिसून येतात. अनेक ठिकाणी रस्त्यालगत बेवारस वाहनांमुळे अपघातही घडतात. अशी वाहने ताब्यात ...
शहराच्या विविध भागात बेवारस तसेच भंगार वाहने दिसून येतात. अनेक ठिकाणी रस्त्यालगत बेवारस वाहनांमुळे अपघातही घडतात. अशी वाहने ताब्यात घेऊन त्यांची हर्रासी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या माेहिमेत आरटीओ तसेच शहर वाहतूक शाखा पाेलिसांची मदत घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने मनपाने शहराच्या विविध भागातील बेवारस तसेच भंगार अवस्थेत पडून असलेल्या चारचाकी वाहनांची माहिती सादर करण्यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच शहर वाहतूक शाखा पाेलिसांना पत्र दिले आहे.
न्यायप्रविष्ट प्रकरण, वाद आहेत का?
शहरातील रस्ते, गॅरेज, सार्वजनिक ठिकाणांवर बेवारस तसेच भंगार अवस्थेत आढळून येणाऱ्या वाहनांबद्दल काही न्यायप्रविष्ट प्रकरणे व वादविवाद आहेत का, याबद्दल सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर वाहने जप्त केली जातील.
मनपाकडून नाेटीस प्रसिद्ध
उघड्यावर पडून असलेल्या वाहनांचा शाेध घेऊन त्याची यादी तयार करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाकडे साेपविण्यात आली हाेती. चारही क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ९० वाहनांचा शाेध घेण्यात आला. यासंदर्भात मनपाने सात दिवसांची नाेटीसही प्रसिद्ध केली हाेती. या नाेटीसचा कालावधी २३ जुलै राेजी संपुष्टात आला आहे.
या भागात सर्वाधिक वाहने
शहरातील शिवर ते थेट धाबेकर फार्म हाऊस, वाशिम बायपास चाैक ते हिंगणा फाटा, अकाेटफैल ते अकाेट रस्ता, फतेहअली चाैक ते दीपक चाैक, राेटरी क्लब कार्यालय ते शहीद अब्दुल हमीद चाैक, आदी मार्गावर बेवारस, भंगार व नादुरुस्त वाहनांची माेठी संख्या दिसून येते. यामुळे वाहतूक समस्येत वाढ झाली आहे. यातील बहुतांश चारचाकी वाहनांना क्रमांक नाहीत, हे विशेष.