आमदार देशमुखांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची माहिती सादर करा;अमरावती ‘एसीबी’चे शैक्षणिक संस्थेला पत्र
By आशीष गावंडे | Published: August 19, 2024 09:37 PM2024-08-19T21:37:07+5:302024-08-19T21:38:00+5:30
या पत्रामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आशिष गावंडे
अकाेला: जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघाचे उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या मागील लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. अमरावती ‘एसीबी’ने आमदार देशमुख यांच्या जिल्हा परिषदेच्या कालावधीतील माहिती देण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र दिल्यानंतर आता चक्क आ.देशमुख यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची माहिती सादर करण्याचे पत्र प्रभात किड्स शाळेला दिल्याचे समाेर आले आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार गठीत झाले. या सरकारला अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण हाेत नाही ताेच शिवसेनेतील पक्षफुटीनंतर राज्यात महायुती सरकारने सत्ता स्थापन केली. त्यावेळी आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीवरुन परत आले आणि त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबाजूने उभे राहणे पसंत केले.
तेव्हापासून आ.देशमुख यांच्या मालमत्तेच्या चाैकशीला अमरावती ‘एसीबी’ने प्रारंभ केला. याविषयी १७ जानेवारी २०२३ राेजी अमरावती कार्यालयात आ.देशमुख यांची चाैकशी करण्यात आली हाेती. मागील काही महिन्यांपासून ही चाैकशी थंडबस्त्यात असताना आता अचानक अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्तरावरुन पुन्हा एकदा आ. देशमुख यांच्या संदर्भातील चाैकशीला प्रारंभ झाला आहे. आ.देशमुख हे सन २००९ ते २०१९ या काळात जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांच्या कालावधीतील इत्थंभूत माहिती सादर करण्याचे पत्र जि.प. प्रशासनाला देण्यात आले आहे. यात भरीस भर आता अमरावती ‘एसीबी’ने चक्क आ.देशमुख यांचा मुलगा व मुलीच्या शैक्षणिक खर्चाबद्दल माहिती सादर करण्यासाठी संबंधित शाळेला पत्र दिल्याचे समाेर आले आहे.
शैक्षणिक खर्च, शुल्काची माहिती द्या!
आ.देशमुख यांचा मुलगा पृथ्वी व मुलगी जान्हवी या दाेन्ही मुलांचा शाळेत प्रवेश घेतल्यापासून ते आजवरचा शैक्षणिक खर्च व जमा केलेल्या शुल्काची माहिती प्रभात किड्स शाळेच्या मुख्याध्यापकांना मागण्यात आली आहे.
मी आजवर काेणत्या कंपनीच्या नावे शासकीय कंत्राट मिळवले, काेणत्या याेजनांचा लाभ मिळवला, कुटुंबियांच्या नावे कुठे कारखाने आहेत, याची माहिती ‘एसीबी’नेच मला द्यावी,अशी माझी त्यांना विनंती आहे. मी मध्यमवर्गीय व शेतकरी कुटुंबातील असल्याने माझ्या उत्पन्नाचा स्त्राेत सर्वश्रुत आहे. माझ्या प्रकरणात चाैकशीअंती ‘एसीबी’चा भ्रमनिरास हाेइल,हे निश्चित.