दिरंगाई करणारे सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:39 AM2017-09-09T01:39:47+5:302017-09-09T01:39:53+5:30
अकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना शुक्रवारी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना शुक्रवारी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) आणि आपले सरकार केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात सेतू केंद्रांना येणार्या अडचणींचे निवारण आणि केंद्रांविरुद्ध तक्रारींची शहानिशा करण्यासाठी गत ५ सप्टेंबर रोजी तांत्रिक तज्ज्ञांची तपासणी पथके गठित करण्यात आली. त्यानुषंगाने पथकांनी ६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ा तील विविध ठिकाणी सेतू केंद्रांची तपासणी केली अस ता, कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या ११ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आणखी १६ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामध्ये तपासणीदरम्यान बंद आढळून आलेल्या किंवा कर्जमाफीचा एकही अर्ज न भरलेल्या सात सेतू केंद्रांना मंडळ अधिकारी आणि तलाठय़ांनी दररोज भेटी देऊन कर्जमाफीचे ऑनलाइन किती अर्ज भरले, किती बाकी आहेत, याबाबतची त पासणी करावी आणि कर्जमाफीचे अर्ज भरण्यात दिरंगाई करणारे, बंद आढळून येणारे दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला.
सुटीच्या दिवशीही कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे काम सुरू!
शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी असली, तरी सुटीचे दोन्ही दिवस जिल्ह्यात कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सेतू केंद्रांवर सुरू राहणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्या तील तहसीलदारांना आदेश दिला आहे.
१ लाख ३८ हजार शेतकर्यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंंत १ लाख ७१ हजार १८८ शेतकर्यांच्या अर्जांंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३८ हजार ५४८ शेतकर्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले, असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.