पाणंद रस्ते कामांचा आराखडा २५ एप्रिलपर्यंत सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:37+5:302021-04-17T04:17:37+5:30
अकोला : जिल्ह्यात पाणंद रस्ते विकासाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन करून पाणंद रस्ते कामांचा तालुकानिहाय आराखडा ...
अकोला : जिल्ह्यात पाणंद रस्ते विकासाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन करून पाणंद रस्ते कामांचा तालुकानिहाय आराखडा २५ एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना दिले.
जिल्ह्यातील पाणंद रस्ते विकासकामांसाठी करावयाच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची ‘ऑनलाइन’ पद्धतीने बैठक घेतली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांचे नियोजन करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून, ग्रामपंचायत स्तरावरील समितीचे ठराव घेण्यात यावे व पंचायत समितीस्तरावर रस्ते कामांचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पाणंद रस्ते कामांची निवड करताना जिल्हा परिषदेच्या संबंधित अभियंत्यांची मदत घेऊन, लोकसहभागातून पाणंद रस्ते तयार करण्यास अधिक प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पाणंद रस्ते कामांचे तातडीने करून, कामांचा तालुकानिहाय आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले.