घरकुलांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करा : जिल्हा परिषद ‘सीईओं’चे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:45 PM2019-08-17T12:45:29+5:302019-08-17T12:45:36+5:30
रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील घरकुल कामांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला
अकोला: रमाई आवास योजनेंतर्गत प्रतीक्षा यादीत नावे असलेल्या आणि जागा उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना घरकुलांचा लाभ देण्यासाठी घरकुलांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिले.
जिल्हा परिषद राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विलास खिल्लारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप भंडारे, राजीव फडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ.एच.आर. मिश्रा, कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे यांच्यासह पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.
रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील घरकुल कामांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला. रमाई अवास योजनेंतर्गत जिल्ह्यात २५ हजार लाभार्थींची यादी तयार असून, ज्यांचे प्रतीक्षा यादीत नाव आहे, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे, अशा पात्र लाभार्थींचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.