शाळांना क्रीडांगणासाठी जागांचे प्रस्ताव सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:17+5:302021-01-21T04:18:17+5:30
अकोला: जिल्ह्यातील क्रीडांगण उपलब्ध नसलेल्या शाळांना क्रीडांगणासाठी ई- क्लास जागा उपलब्ध करण्याकरिता शाळांचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्याचे ...
अकोला: जिल्ह्यातील क्रीडांगण उपलब्ध नसलेल्या शाळांना क्रीडांगणासाठी ई- क्लास जागा उपलब्ध करण्याकरिता शाळांचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी देण्यात आले.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांना क्रीडांगण उपलब्ध नाही , अशा शाळांचे प्रस्ताव तयार करून परिसरातील ई- क्लास व एफ क्लास जमिनीवर शाळांना क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला तब्येत देण्यात आले. जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तांवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी नियोजन करून ज्या शाळांकडे पाच एकरपर्यंत शेती आहे , अशा शाळांच्या शेतीचा ग्रामपंचायतीमार्फत वार्षिक लिलाव करून त्याद्वारे उपलब्ध होणारा निधी ग्रामपंचायतींनी शाळांच्या मागणीनुसार शाळांची देखभाल -दुरुस्ती व शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी खर्च करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांनी पटसंख्या वाढीसोबतच गुणवत्ता वाढीच्या निकषावर काम केले, अशा शाळांना प्रोत्साहन पारितोषिक देण्यासाठी शाळांच्या यादीला सभेत मंजुरी देण्यात आली. बाळापूर पंचायत समितीअंतर्गत काही शिक्षकांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम अद्याप प्राप्त झाली नसल्याने यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य रामकुमार गव्हाणकर, पवन बुटे, गणेश बोबडे, वर्षा वजीरे , रंजना विल्हेकर , आम्रपाली खंडारे , प्रगती दांदळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अधिसंख्यपदाच्या कारवाईची
पडताळणी करा!
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अधिसंख्यपदावर पात्र ठरविण्यात आलेल्या १७१ शिक्षकांपैकी आठ ते दहा शिक्षकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यासंदर्भात पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण सभापतींनी या सभेत शिक्षण विभागाला दिले.