सिंचनाच्या नवीन कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:47+5:302021-01-08T04:58:47+5:30
अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागांतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, सिंचनाच्या नवीन कामांची अंदाजपत्रके तयार करून, कामांचे प्रस्ताव तातडीने ...
अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागांतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, सिंचनाच्या नवीन कामांची अंदाजपत्रके तयार करून, कामांचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी गुरुवारी लघुसिंचन विभागाला दिले.
जिल्हा परिषद लघुसिंचन विभागांतर्गत जिल्हयातील कोल्हापूरी बंधारे, सिमेंट नालाबांध, गावतलाव, पाझर तलाव आदी कामांचा आढावा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी घेतला. जिल्ह्यातील प्रलंबित सिंचनाच्या कामांची माहिती यावेळी घेण्यात आली. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासह नवीन सिंचनाच्या कामांची अंदाजपत्रके तयार करून कामांचे प्रस्ताव शासनाच्या संबंधित विभागाकडे तातडीने मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाला दिले. यावेळी जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित अभियंते उपस्थित होते.