शाळा दुरुस्ती कामांचे प्रस्ताव सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:17+5:302021-04-23T04:20:17+5:30
अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा इमारती दुरुस्ती कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत गुरुवारी ...
अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा इमारती दुरुस्ती कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीच्या कामांसह शिकस्त शाळा इमारती पाडून नवीन इमारती बांधकामांच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यानुषंगाने शाळा इमारतींची दुरुस्ती आणि शिकस्त शाळा पाडून नवीन इमारती बांधकामांसाठी कामांचे प्रस्ताव समितीच्या पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले. समितीच्या मागील सभेचे इतिवृत्त या सभेत मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत समिती सदस्य आम्रपाली खंडारे, वर्षा वझिरे, प्रगती दांदळे, उपशिक्षणाधिकारी तायडे यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
महिला बालकल्याण समितीची सभा;
पाळणाघर योजना राबविणार!
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीची सभा ऑनलाइन पद्धतीने गुरुवारी घेण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या गरीब महिलांच्या मुलांसाठी पाळणा घर योजना राबविण्यासंदर्भात समितीच्या पुढील सभेत निर्णय घेण्याचे या सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेत समितीचे सदस्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे सहभागी झाले होते.