शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचा सर्व्हे करून अहवाल सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:23 PM2019-11-01T12:23:23+5:302019-11-01T12:24:01+5:30
पीक नुकसानाचे त्वरित पंचनामे करून सर्व्हेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत.
अकोला: शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतला असून सोयाबीन, तूर, ज्वारी, कपाशीसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकºयांच्या पीक नुकसानाचे त्वरित पंचनामे करून सर्व्हेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत. शेतामध्ये जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर आ. देशमुख यांनी येत्या सोमवारी महसूल यंत्रणेकडून आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे.
ऐन दिवाळीच्या दिवसांत परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका, तुरीसह फळबागांचे मोठे नुकसान केले असून, कापणीला आलेले पीक संपूर्णत: नष्ट झाली आहे. संततधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेली पिके सडली आहेत. दिवाळीच्या दिवशी शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी मतदारसंघातील व्याळा, रिधोरा, बोरवाकडी, उरळ, निंबा, काजीखेड, अंदुरा, वजेगाव, निंबी हिंगणा, सागर, कारंजा रमजानपूर आदी भागातील शेतकºयांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या असता, पावसाने शेतकºयांना संकटाच्या खाईत ढकलल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे आजपर्यंत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी यांनी किती शेतकºयांच्या पीक नुकसानाचे पंचनामे केले, पीक विम्यासाठी नेमक्या किती शेतकºयांनी अर्ज सादर केले, यासंदर्भात इत्थंभूत अहवाल सादर करण्याचे निर्देश आ. नितीन देशमुख यांनी महसूल यंत्रणेला दिले. यासंदर्भात शिवसेनेने येत्या सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
विमा न काढलेल्या शेतकºयांचा समावेश
खरीप हंगामातील पिकांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना आहे. बाळापूर-पातूर मतदारसंघातील विमाधारक शेतकºयांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेल, यात दुमत नाही; परंतु ज्या शेतकºयांनी विमा काढला नसेल, त्यांनाही नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्याचे निर्देश आ. नितीन देशमुख यांनी दिले आहेत.
शेतकºयांनी पीक नुकसानापोटी त्यांचे अर्ज कृषी अधिकारी, कृषी सहायक तसेच ग्रामसेवकांकडे तातडीने सादर करावेत. अर्जाचा स्वीकार न केल्यास थेट मला फोन करा. या कठीण परिस्थितीत शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
-आमदार, नितीन देशमुख.