काळ्या गव्हाचा यशस्वी प्रयोग; सात एकरात बहरले पीक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:22 AM2021-02-25T04:22:50+5:302021-02-25T04:22:50+5:30
नासीर शेख खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी येथील अमोल शालिग्राम येनकर या युवा शेतकऱ्याने सात एकरात काळ्या गव्हाची लागवड ...
नासीर शेख
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी येथील अमोल शालिग्राम येनकर या युवा शेतकऱ्याने सात एकरात काळ्या गव्हाची लागवड केली असून, सध्या पीक बहरले आहे.
देशात काळ्या गव्हाची शेती एक टक्क्यापेक्षा कमी शेतकरी करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात जास्त प्रमाणात काळ्या गव्हाची लागवड केली जाते. बाजारात काळ्या गव्हाची मागणी जास्त असून, पुरवठा कमी असल्याने सद्य:स्थितीत काळ्या गव्हाच्या पेरणीकरिता शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. पातूर तालुक्यातील चान्नी येथील युवा शेतकरी अमोल शालिग्राम येनकर यांनी आपल्या शेतात काळ्या गव्हाची लागवड करायचे ठरविले. त्यानंतर त्यांनी पुढाकार घेत बियाणे विकत आणित पेरणी केली. सद्य:स्थितीत पीक शेतात बहरले असून, एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन होण्याची आशा येनकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या काळ्या गव्हाची लावगड करून शेतकऱ्यांनी संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काळ्या गव्हाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन होणार असल्याने शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळ्या गव्हाची पेरणी करावी. काळ्या गव्हाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि मदत करू.
-अमोल येनकर, शेतकरी, चान्नी