विदर्भात ड्रॅगन फ्रुटचा यशस्वी प्रयोग; पंदेकृविच्या प्रक्षेत्रावर लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:17 AM2021-05-16T04:17:43+5:302021-05-16T04:17:43+5:30
अकोला : जमिनीचा हलका पोत, पाण्याची कमतरता यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नाही. त्यामुळे केवळ पारंपरिक शेतीवरच अवलंबून ...
अकोला : जमिनीचा हलका पोत, पाण्याची कमतरता यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नाही. त्यामुळे केवळ पारंपरिक शेतीवरच अवलंबून न राहता शेतकरी इतर पर्याय शोधत आहे. कोरडवाहू क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या विदेशी ड्रॅगन फ्रूट शेतीकडे विदर्भातील शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर या फळाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. सोबतच विदर्भातील इतर जिल्ह्यातही या फळाची लागवड केली आहे.
परदेशात पिकणाऱ्या फळांची लागवड आपल्या देशात करून त्याचे उत्पादन घेणे तसे आव्हानात्मक असते.
ते फळ म्हणजे ड्रॅगन फळ होय. सद्यस्थितीत विदर्भात फारच मोजक्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट फळपिकांची लागवड केली आहे. त्याच अनुषंगाने विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उद्यानविद्या महाविद्यालय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील फळ शास्त्र विभागाच्या प्रक्षेत्रावर ड्रॅगन फ्रूट या फळपिकाची लागवड व त्यावर संशोधनाचे कार्य सुरू आहे. तसेच पूर्व विदर्भातील भंंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी उत्पन्नही घेतले आहे. थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. पुढील भविष्यात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूट हे आश्वासक पीक होऊ शकते, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कृषी विद्यापीठ अंतर्गत फळ शास्त्र विभागाच्या माध्यमातून लागवडीसंदर्भात निरीक्षणे प्राप्त झाल्यानंतर या फळ पिकाच्या लागवडी संदर्भात चांगल्या शिफारशी देण्यात येतील.
--बॉक्स--
बारामती येथून आणली रोपे
कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर एक एकरात ६० ड्रॅगन फ्रूटची रोपे लावण्यात आली आहे. ही रोपे बारामती येथून आणली असल्याचे सांगण्यात आले. या रोपांची दोन वर्षांआधी लागवड केली आहे.
--बॉक्स--
विदर्भात या जिल्ह्यात लागवड
विदर्भात प्रामुख्याने वाशिम, अकोला, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे प्राथमिक लागवड केलेली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यात उत्पन्नसुद्धा घेण्यात येत आहे.
--बॉक्स--
रोपेही केली तयार
कृषी विद्यापीठाने ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसोबत छाटे कलम पद्धतीने रोपवाटिकेत अभिवृद्धी करण्यासंदर्भात नियोजन मागील दोन वर्षापासून केलेले आहे. सर्व रोपे तयार असून शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून देण्यात येतील.
--कोट--
बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन, त्याला दर किती मिळतील, किती प्रमाणात विकल्या जातील, हे सर्व विषय लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ड्रॅगन फ्रूटची लागवड करावी, खूप मोठ्या प्रमाणात न करता थोड्या प्रमाणात लागवड करणे योग्य राहीपल.
- पी. के. नागरे, अधिष्ठाता, उद्यानविद्या विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला