तासाभराच्या गोंधळानंतर ज्येष्ठांच्या लसीकरणाला यशस्वी सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 10:46 AM2021-03-02T10:46:31+5:302021-03-02T10:47:04+5:30
CoronaVaccination जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांची लक्षणीय गर्दी दिसून आली.
अकोला : देशभरासह १ मार्चपासून ज्येष्ठांच्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अकोल्यातही या मोहिमेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या सत्रात कोविन ॲपमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ज्येष्ठांना थोडा त्रास झाला. मात्र, त्यानंतर लसीकरणाची उत्साहात सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजेनंतर जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांची लक्षणीय गर्दी दिसून आली. ज्येष्ठांसाठीच्या कोविड लसीकरण मोहिमेला सोमवारपासून जिल्ह्यातील ९ केंद्रांवर सुरुवात झाली. यामध्ये महापालिका क्षेत्रातील जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मनपाच्या सिंधी कॅम्प येथे, तर प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राचा समावेश आहे. पातूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सकाळी ९ वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या तासात कोविन ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांना थोडा त्रास सहन करावा लागला. तासाभरात ही समस्या निकाली काढण्यात आल्यानंतर ज्येष्ठांना यशस्वी लसीकरणास सुरुवात करण्यात आली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील लसीकरण केंद्रामध्ये दुपारी २.३० वाजेनंतर ज्येष्ठ नागरिक स्वयंस्फूर्तीने लस घेण्यासाठी येताना दिसून आले. त्यामुळे या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून आली. ज्येष्ठांना त्रास होऊ नये, म्हणून या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
कोरोना लसीविषयी उत्सुकता होती, आज घेतली
कोरोनावरील लसीची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती, आज प्रत्यक्षात घेण्याची संधी मिळाली. पहिला डोस घेतल्यावर काहीच वाटले नाही. त्यामुळे लस सुरक्षित असल्याचे समाधानही झाले. इतर ज्येष्ठ नागरिकांनीही लस घ्यावी.
- हरिदास मोतीराम ठाकरे, ज्येष्ठ नागरिक
लस घेतल्याने दिलासा मिळाला
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक दिवसांपासून कोविड लसीची प्रतीक्षा होती. आज पहिल्याच दिवशी लस घेण्याची संधी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला. प्रत्येकाने लस घ्यावी.
- निर्मला हरिदास ठाकरे, ज्येष्ठ नागरिक
लसीचा आधार मिळाला
कोरोनाविषयी प्रत्येकाच्याच मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लसीचे महत्त्वही तेवढेच आहे. आज लसीचा पहिला डोस घेतल्याने मोठा आधार मिळाला. लस सहज उपलब्ध झाली, कुठलाच त्रास झाला नाही. संधी मिळताच प्रत्येकाने लस घेऊन सुरक्षित व्हावे.
- प्रेमलता ओमप्रकाश अग्रवाल, ज्येष्ठ नागरिक
खासगी केंद्राची केली पाहणी
जीवनदायी योजनेशी संलग्नित असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये खासगी कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याची पाहणी सोमवारी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली. पाहणीचा अहवाल वरिष्ठस्तरावर पाठविण्यात येणार आही. त्यानंतरच यातील काही केंद्रांना मान्यता दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
जिल्ह्यात नऊ केंद्रांवर ज्येष्ठांसाठी कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी जिल्ह्यात कुठलीही अडचण आली नाही. अनेकांची केंद्रावरच नोंदणी करण्यात आली. काहींनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यामुळे अडचण आली नाही. खासगी केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम