ऑटोचालकाचा असाही प्रामाणिकपणा, दागिन्यांची पर्स केली प्रवाशाला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 07:36 PM2021-06-08T19:36:36+5:302021-06-08T19:36:46+5:30
Akola News : पर्समध्ये सोन्याचे दागिने, पतीचे आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर काही महत्त्वाचे दस्तावेज होते.
अकोला : पंचशील नगर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेची सोन्याचे दागिने व महत्त्वाचे दस्तावेज असलेली पर्स ऑटोमध्ये राहिल्यानंतर प्रामाणिक ऑटो चालकाने ही पर्स व दागिने वाहतूक शाखेत जमा केले. त्यानंतर वाहतूक शाखेने महिलेचा शोध घेऊन त्यांना दागिने परत केले. ऑटो चालकाच्या या प्रामाणिकतेबद्दल वाहतूक शाखेने त्यांचा गौरव केला.
पंचशील नगर येथील रहिवासी आरती मंगेश मोरे या घरगुती कामानिमित्त महाराष्ट्र बँकेत गेल्या होत्या. तेथून परत येत असताना त्यांचा मोबाईल हरविल्याचे लक्षात आले. त्यामुळे मोबाईल हरविल्याची तक्रार देण्यासाठी त्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गेल्या. तेथून त्या ऑटोने घरी परत गेल्या असता पर्स हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पर्समध्ये सोन्याचे दागिने, पतीचे आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर काही महत्त्वाचे दस्तावेज होते. त्यानंतर ऑटोचालक सिंधी कॅम्प येथील रहिवासी मोहम्मद हनिफ मोहम्मद इक्बाल यांनी त्यांच्या ऑटोत राहिलेली पर्स वाहतूक शाखेत जमा केली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी महिलेचा शोध घेऊन त्यांना वाहतूक शाखेत बोलावले. त्यानंतर त्यांचे दागिने व दस्तावेज परत केले. यावेळी ऑटोचालक मोहम्मद हनीफ मोहम्मद इक्बाल यांचाही वाहतूक शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला.