पेढी नदीला अचानक पुर; अनेक गावांना पुराचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 11:56 AM2022-07-06T11:56:01+5:302022-07-06T12:28:20+5:30
Sudden flooding of the river : पुलावरुन पाणी वाहून जात असल्याने अनेक तास वाहतूक खोळंबली होती.
- संजय उमक
मूर्तिजापूर : रविवारी व मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने तालुक्यातील पेढी नदीला अचानक पुर आल्याने नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्याने व्यापली आहे. नदी काठावरील या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलावरुन पाणी वाहून जात असल्याने अनेक तास वाहतूक खोळंबली होती. नदी काठावर असलेल्या शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
अमरावती, मोर्शी व चांदूर बाजार परिसरात सोमवारी व मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने पावसाने विसरोळी धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने पेढी नदीला अचानक पुर आल्याने नदीच्या काठावरील, खोडद, बपोरी, सोनोरी, हिवरा (कोरडे), बल्लारखेड, लोणसना या गावात पुराचे पाणी शिरले आहे. २४ पुराची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या गावकऱ्यांनी सतर्क राहून, सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन ध्वनिक्षेपकावरुन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी अचानक पुर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक तास मुर्तिजापूर- आसरा रोडवर हिवरा कोरडे येथील पुलावरून व अमरावती - दर्यापूर या रोडवरील भातकुली येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने अनेक ५ ते ६ तास वाहतूक खोळंबली होती.