अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा
By Admin | Published: March 14, 2015 11:55 PM2015-03-14T23:55:34+5:302015-03-14T23:55:34+5:30
बुलडाणा येथे वीज पडल्याने विजेच्या उपकरणांचे नुकसान.
बुलडाणा : जिल्ह्यात शुक्रवारच्या रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे गहू, हरभरा, मका व इतर रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलडाणा शहर परिसरातील केशव नगरात वीज पडून नारळाचे झाड जळाले असून, अनेकांच्या घरातील टीव्ही व विजेची उपकरणे जळाली आहेत. जिल्ह्यात आठ दिवसातून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे काय करावे, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकर्यांना पडला आहे.
गतवर्षी झालेल्या अतवृष्टी व गारपिटीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले होते, तर यावर्षी अत्यल्प पावसाने खरिप पिकाचे नुकसान केले आहे. या संकटाचा सामना करीत असंख्य शेतकर्यांनी रब्बीची पेरणी केली; परंतु ही पिके काढणीच्या बेतात असतानाच गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतकर्यांना हैरान करून सोडले आहे. आठ दिवसातून एकवेळा तरी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या दहा तारखेला जिल्ह्याच्या बहुतांश भागाला अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला होता.
त्यानंतर पुन्हा १ मार्चला जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. नंतर तीन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. एवढय़ावरच समाधान न झालेल्या निसर्गाने पुन्हा काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात करून दिली.