सुधीर कॉलनीतील जुगारावर विशेष पथकाचा छापा!
By Admin | Published: April 13, 2017 02:09 AM2017-04-13T02:09:04+5:302017-04-13T02:09:04+5:30
एकाच महिन्यात त्याच ठिकाणी तिसरी कारवाई : सिव्हिल लाइन्स पोलीस मॅनेज
अकोला : सुधीर कॉलनीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी त्यांच्या पथकासह बुधवारी दुपारी छापा टाकला. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याजवळून रोख रकमेसह सहा हजार ६५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याच ठिकाणावर विशेष पथकाने तिसरी कारवाई केली असून, सिव्हिल लाइन्स पोलिसांचे या जुगाऱ्यांशी साटेलोटे असल्याचे बोलल्या जात आहे.
सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सुधीर कॉलनीमध्ये जुगार अड्डा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अड्ड्यावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये त्यांनी तीन हजार रुपये रोखसह तीन मोबाइल जप्त केले. यासोबतच जवाहरनगर येथील रहिवासी ज्ञानेश्वर भिकाजी शिंदे (५९), सुधाकर बळीराम खंडारे (६२, रा. गीतांजली अपार्टमेंट, सुधीर कॉलनी), दीपक श्यामसुंदर मिश्रा (४५, रा. लेबर कॉलनी, तारफैल), रंजन वासुदेव काटकर (४०, रा. दत्तवाडी, लहान उमरी) यांना अटक केली.
विशेष पथकाची याच ठिकाणचीही महिन्याभरातील तिसरी कारवाई आहे. विशेष पथकाच्या या कारवाईमुळे सिव्हिल लाइन्स पोलिसांची हप्तेखारी समोर येत असून, त्यांना एकही जुगार अड्डा व वरली अड्डा दिसत नसल्याचा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
खंडणीखोरांचा ठाण्यात प्रवेश
खंडनी बहाद्दर, मारहाण, व्यापाऱ्यांना लुटमार करणारे काही स्वयंघोषित राजकीय पक्षाचे पदाधिकारी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये थेट प्रवेश करतात. कोणत्याही गुन्ह्यातील आरोपींना सोडवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना थेट आमीष देण्यात येते. यावरून सिव्हिल लाइन्स पोलिसांचे या गुन्हेगारी प्रवृत्तीशी साटेलोटे असल्याचे स्पष्ट होत आहे.