वाडेगाव येथे शेवग्याचे पीक धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:14+5:302020-12-15T04:35:14+5:30
वाडेगाव : परिसरात शेवग्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाच्या सरी कोसळत ...
वाडेगाव : परिसरात शेवग्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेवग्याचे पीक धोक्यात सापडले आहे. ढगाळ वातावरणामुळे शेवग्याचा फुलोरा गळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, तामसी, चिंचोली, देगाव, नकाशी, धनेगाव, टाकळी खुरेशी, हिंगणा, बेलुरा, दिग्रस, तांदळी परिसरात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर किडींचे आक्रमण वाढले आहे. रब्बी हंगामातील हरभरा, गहू व खरिपातील तुरीच्या पिकाचे नुकसान होत आहे. तुरीच्या पिकाचा फुलोरा गळत असून, हरभऱ्यावर किडींचे आक्रमण वाढले आहे. दिग्रस बु. येथील शेवग्याच्या पिकाचा बहर गळत असल्याने हजारो रुपयांचे नुकसान होणार असल्याची शक्यता शेतकरी संतोष वाकोडकार यांनी वर्तविली आहे.
---------------
मागील सहा महिन्यांपासून शेवगा पिकाची काळजी केली; परंतु ढगाळ वातावरणामुळे पिकाचा फुलोरा गळून पडत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
संतोष वाकोडकार, शेतकरी, दिग्रस बु.
--------------------------------------
तुरीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला असून, फवारणीची कामे सुरू आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्याच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करावे.
-गणेश काळे, शेतकरी, तामसी.