..तर ८३ कुटुंबांवर येणार आत्महत्येची वेळ!
By admin | Published: November 6, 2014 11:03 PM2014-11-06T23:03:41+5:302014-11-06T23:03:41+5:30
अकोला कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेचे कर्मचारी ठरले बळी
अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावून ८३ कर्मचार्यांच्या बडतर्फीचे आदेश काढणार्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे या कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबीयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सहा महिन्यांत कोणतीही कार्यवाही न करणार्या प्रशासनाने बडतर्फीचे आदेश मात्र तडकाफडकी काढल्याने प्रशासनाच्या एकूण भूमिकेवरच संशय व्यक्त होत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नोकरभरती प्रक्रि येत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ८३ कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले. हा आदेश काढताना कर्मचार्यांची बाजूच विद्यापीठ प्रशासनाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाची अंमलबजावणी न करता, दुसर्या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून कर्मचार्यांच्या कारकिर्दीवर नांगर फिरविण्याचे काम कृषी विद्यापीठ प्रशासनाने केले. कृषी विद्यापीठाच्या भरतिप्रक्रियेबाबत तक्रारी झाल्यानंतर या प्रकरणाची रीतसर चौकशी करण्यात आली. त्यात प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा ठपका समितीने ठेवला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने कर्मचार्यांच्या विरोधात निर्णय दिला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने कर्मचार्यांना दिलासा देताना कृषी विद्यापीठाला भरतिप्रक्रिया नव्याने राबवून या कर्मचार्यांना त्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा आदेश पारित केला. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातच भरतिप्रक्रिया राबविण्यासाठी दिलेला दुसरा पर्याय विद्यापीठाला हाताळता आला असता. कृषी विद्यापीठ प्रशासनाने भरतिप्रक्रियेत झालेल्या चुका लपविण्यासाठी आणि अधिकार्यांचा बचाव करण्यासाठी कर्मचार्यांचा बळी घेतला.