कर्जबाजारी शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:13 AM2017-11-10T01:13:58+5:302017-11-10T01:14:12+5:30
राष्टÑीयीकृत बँकेकडून घेतलेले तीन लाख रुपयांचे पीककर्ज आणि मागील दोन वर्षांपासून होणारी नापिकी, त्यातच वडिलांचे निधन, अशा विपरीत परिस्थितीत...
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी/कोराडी : राष्टÑीयीकृत बँकेकडून घेतलेले तीन लाख रुपयांचे पीककर्ज आणि मागील दोन वर्षांपासून होणारी नापिकी, त्यातच वडिलांचे निधन, अशा विपरीत परिस्थितीत कर्जपरतफेडीसोबतच शेती व घरखर्चाच्या चिंतेत शेतकºयाने त्याच्या राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा (पाटण) (ता. कामठी) येथे मंगळवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
मनोहर गणपतराव ठाकरे (४७, रा. खापा-पाटण, ता. कामठी) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. मनोहर ठाकरे यांच्याकडे खापा (पाटण) शिवारात ८.०२ हेक्टर (२०.०५ एकर) शेती आहे. यातील ३.९८ हेक्टर (९.९५ एकर) शेती ही मनोहर ठाकरे यांच्या नावे असून, उर्वरित शेती त्यांचे वडील गणपतराव ठाकरे यांच्या नावे
आहे.
विशेष म्हणजे, मनोहर हे गणपतराव यांचा एकुलता एक मुलगा होय. त्यांनी २०१५ मध्ये बँक आॅफ बडोदाच्या कोराडी शाखेकडून तीन लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पीक हाती न आल्याने त्यांना या कर्जाच्या परतफेडीची चिंता होती. मात्र, वडील हयात असल्याने त्यांना मानसिक आधार होता.
दुर्दैवाने चार महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शिवाय, त्यांनी यावर्षी शेतात लवकी आणि दोडक्यांची लागवड केली होती. प्रतिकूल वातावरणामुळे लवकी आणि दोडक्यांचे पीक नष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली, शिवाय त्यांनी कर्जमाफीचा अर्ज भरला होता. त्यांनी मंगळवारी शेतातील कापसाची वेचणी करून तो घरी आणला आणि खोलीत गंजी लावून ठेवला.
रात्री सर्वांसोबत जेवण करून त्यांनी दोन्ही मुले पीयूष (१९) व सान्निध्य (१३) तसेच पत्नी लता (४०) झोपी गेले. मनोहर मात्र चिंता करीत खोलीतील कापसाच्या गंजीवर बसले होते. त्यातच त्यांनी छताला गळफास लावला आणि स्वत:ला संपवून घेतले.
हा प्रकार अर्ध्या तासाने घरच्या मंडळींच्या लक्षात आला. तोपर्यंत ते गतप्राण झाले होते. लगेच खापरखेडा पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्जापायी आत्महत्या केल्याचा अहवाल
या घटनेची माहिती मिळताच कामठीचे तहसीलदार बाळासाहेब टेळे, मंडळ अधिकारी लांजेवार, तलाठी बिरासदार यांच्यासह महसूल विभागातील काही अधिकाºयांनी बुधवारी सकाळी मनोहर ठाकरे यांच्या कुटुंबीयांची खापा (पाटण) येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या आत्महत्येबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. मनोहर ठाकरे यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष या अधिकाºयांनी काढला. त्यांनी याबाबत प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना पाठविला, अशी माहिती महसूल विभागातील कर्मचाºयांनी दिली.