शेतमाल विकला न गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:29 PM2020-06-06T12:29:27+5:302020-06-06T12:33:00+5:30
अकोला तालुक्यातील धामणा येथील शेतकऱ्याने शुक्रवारी रात्री उशीरा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
बोरगाव वैराळे (जि. अकोला) : खरीप हंगाम तोंडावर आल्यानंतरही गत हंगामातील शेतमाल विकला न गेल्यामुळे पेरणीसाठी पैसा कसा उभा करावा, या विवंचनेत पडलेल्या अकोला तालुक्यातील धामणा येथील शेतकऱ्याने शुक्रवारी रात्री उशीरा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तेजराव मुकिंदराव भांबेरे (५५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
येथून जवळच असलेल्या धामणा गावातील शेतकरी तेजराव मुकिंदराव भांबेरे शेतकऱ्याचा शेतमाल अद्यापपर्यंत विकला गेला नाही. आता खरीप हंगाम जवळ आला असताना पेरणीसाठी बि-बियाणे, खते कसे खरेदी करावे, असा प्रश्न तेजराव यांच्यासमोर उभा ठाकला होता. या विवंचनेतूनच त्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने तेजराव यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरु असताना शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली, अशी माहिती त्यांचे नातेवाईक संजय श्रीराम भांबेरे यांनी दिली.
यावर्षी कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांच्या घरात कपाशी, हरभरा, तुर,ज्वारी यासह सगळा शेतमाल पडून आहे. कपाशी,हरभरा, तुर विक्री साठी शेतकऱ्यानी शासकीय खरेदी केंद्रांवरनोंदणी केलेली आहे; परंतु खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. पेरणीचा हंगाम जवळ आल्यामुळे घरात शेतमाल असुनही तो विकल्या न गेल्यामुळे शेतकऱ्यासमोर पेरणीसाठी पैशांची जुळवा-जुळव करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.