विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:50 AM2019-11-15T10:50:25+5:302019-11-15T10:50:52+5:30
सासरकडील मंडळींकडून श्वेताचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत हो
मूर्तिजापूर: माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोही येथील २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून बुधवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात माना पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विवाहितेने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. तिला दोन महिन्यांची एक मुलगी आहे.
श्वेता सेवने हिने नात्याने मामेभाऊ असणाºया स्वप्निल आंबिलकर याच्यासोबत ६ डिसेंबर २०१६ रोजी न्यायालयात प्रेमविवाह केला होता. काही महिने सुखाचे गेले. लग्नानंतर श्वेता पतीसोबत पुण्याला वास्तव्याला होती. त्यानंतर श्वेता व तिचा पती स्वप्निल हे पोही गावी राहायला आले. दरम्यान, सासरकडील मंडळींकडून श्वेताचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. तिने तशी माहिती तिच्या आईला दिली होती. त्यानंतर सासरच्या मंडळींनी श्वेतास माहेरच्या नातेवाइकांसोबत बोलण्यास मनाई केली. जुलै २०१९ ला तिने आईला फोन करून प्रसूतीसाठी ती पोही येथे येणार असल्याचे सांगितले; परंतु पती व सासरकडील लोकांनी दर्यापूरला माहेरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी श्वेताने मुलीला जन्म दिला. श्वेताचे वडील प्रल्हाद सेवने (रा. साईनगर, दर्यापूर) यांच्या तक्रारीनुसार मूर्तिजापूर पोलिसांनी पती स्वप्निल गोपाल आंबिलकर, सासरा गोपाल तुळशीराम आंबिलकर, सासू प्रमिला आंबिलकर, नणंद रूपाली तायवाडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८, अ ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, नंदकिशोर टिकार, पंजाबराव इंगळे व सहकारी करीत आहे.
(शहर प्रतिनिधी)