'लाइफ इन्शुरन्स'च्या व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 06:30 PM2020-08-10T18:30:37+5:302020-08-10T18:30:54+5:30
विशाल प्रभाकर वानखेडे ३४ यांनी त्यांच्या आझाद कॉलनी येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली.
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद कॉलनी येथील रहिवासी असलेल्या तसेच एचडीएफसी लाइफ इन्शुरन्समध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या एका ३४ वर्षीय युवकाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
आझाद कॉलनी येथील रहिवासी विशाल प्रभाकर वानखेडे ३४ यांनी त्यांच्या आझाद कॉलनी येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण वानखडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून विशाल वानखेडे यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास खदान पोलिसांनी सुरू केला आहे. विशाल वानखेडे यांचे वडील सेवानिवृत्त पोस्टमास्तर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विशाल वानखेडे यांच्या मृत्यूचे कारण समोर आले नसून, पोलीस शोध घेत आहेत.