फरार आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Published: March 12, 2017 02:21 AM2017-03-12T02:21:57+5:302017-03-12T02:21:57+5:30
प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी: वाशिम जिल्ह्यात घेतला गळफास.
सायखेड (जि. अकोला), दि. ११- प्राणघातक हल्लय़ानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या मुख्य आरोपी नीलेश गोवर्धन इंगळे (३0) याने वाशिम जिल्ह्यातील काटा रोड रेल्वे स्टेशन शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ मार्च रोजी पहाटे घडली.
बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्या चोहोगाव येथील मृतक नीलेश हा एका विनयभंग प्रकरणातील आरोपी होता. विनयभंगप्रकरणाच्या पंचनाम्यावर चोहोगावच्या गजानन गंगाधर गालट याने सही केल्याच्या कारणावरून नीलेशने गजाननवर ९ मार्च रोजी कुर्हाडीने वार करून प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी महादेव गालट यांच्या फिर्यादीवरून चौघा बाप-लेकांविरुद्ध बाश्रीटाकळी पोलिसांत भादंवि ३0७ नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा केलेला नसूनही त्याबद्दल शिक्षा भोगावी लागणार आहे, या काळजीने नीलेश गत काही दिवसांपासून निराश होता. अशातच त्याने रागाच्या भरात गजाननवर प्राणघातक हल्ला केला. तेव्हापासून त्याचा थांगपत्ता नव्हता. ११ मार्चच्या पहाटे वाशिम जिल्ह्यातील काटा रोड रेल्वे स्टेशनजवळ त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. घटनेची माहिती वाशिम ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नीलेशचे नातेवाईकसुद्धा घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या घटनेमुळे गावात तणाव निर्माण होऊ नये याकरिता पोलीस बंदोबस्त वाढविण्यातआला. दरम्यान गोवर्धन इंगळे याच्या फिर्यादीवरुन वाशिम पोलीसांनी गजानन काळे, सुनिल काळे, महादेव गालट व गंगाधर गालट या चौघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.