आदिवासी शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 06:04 PM2019-11-19T18:04:02+5:302019-11-19T18:04:08+5:30
तुळशीराम नामदेव शिंदे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
आलेगाव (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून ६२ वर्षीय वृद्ध शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना पिंपरडोळी येथे १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. विशेष म्हणजे सात दिवसांपासून सदर शेतकºयाचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. तुळशीराम नामदेव शिंदे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
यावर्षी परतीच्या पावसाने शेतकºयाच्या तोंडातील घास पळवला. पावसामुळे हातात आलेले पीक गेले. त्यामुळे, पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथील तुळशीराम नामदेव शिंदे यांच्याकडे ४ एकर शेतात सोयाबीनचे पिक होते. परंतु सततच्या पावसामुळे त्यांना सोयाबीन सोंगता सुध्दा आले नाही. त्यामुळे पेरणीचा खर्च सुध्दा निघाला नाही. परिणामी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यात बँकेच्या कर्जाचे ओझे सुध्दा होते. या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केली. १३ नोव्हेंबर रोजी तुळशीराम शिंदे कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. १९ नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र आलेगांव अंतर्गत येत असलेल्या नवेगाव वनविभागाच्या जंगलामध्ये निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच आलेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे,पद्माकर पातोंड ,दादाराव आढाव ,सुनील भाकरे हे घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी पंचनामा करुन सात दिवसापासून झाडाला लटकलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे.(वार्ताहर)