उन्हाळी कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:25+5:302021-03-13T04:33:25+5:30
कापूस, तेलबिया व ज्वारी हे मुख्य पीक असलेल्या अकोला जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. दरवर्षी कांदा पिकाचे ...
कापूस, तेलबिया व ज्वारी हे मुख्य पीक असलेल्या अकोला जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. दरवर्षी कांदा पिकाचे होणारे नुकसान, बाजारपेठेत मिळणारा कमी दर यामुळे शेतकरी मेटाकुटीस येतो. तरीही यंदा चांगले उत्पन्न मिळेल या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवड करतात. यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला; मात्र जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा आला तेव्हा शासनाने निर्यातबंदी केली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघणे कठीण झाले. सोबतच यावर्षी कांदा बियाणेसुद्धा महागले. दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी पाचशे ते सहाशे रुपये पायलीने बीज खरेदी करतात. मात्र, यंदा कांदा बियाणाच्या एका पायलीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागले. परिणामी, कांद्याच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली.
उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळेल या अपेक्षेने महागडे बियाणे खरेदी करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. गेल्या १० ते १२ दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर कमी होत आहे. कांद्याला सरासरी १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर सांगितला जात आहे. याच कांद्याला मागील १५ ते २० दिवसांआधी ३५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरीवर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
--बॉक्स--
कांदा लागवड (तालुकानिहाय)
अकोला ३१२ हेक्टर
बार्शी टाकळी २८१ हेक्टर
अकोट २.८ हेक्टर
एकूण ५९६ हेक्टर
--कोट--
यावर्षी महागडे बियाणे घेऊन कांदा लागवड करावी लागली. वातावरणाने साथ दिल्याने कांद्याचा दर्जा चांगला आहे. दिवसेंदिवस भाव कमी होत असल्याने चिंता असून, यंदा तरी भाव चांगला मिळावा हीच अपेक्षा आहे.
विजय शेगोकार, शेतकरी, सोनाळा