उन्हाचा कडाका वाढला, प्रकृतीला सांभाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:18 AM2021-04-06T04:18:10+5:302021-04-06T04:18:10+5:30
जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. त्यामुळे अंगदुखी, डोकेदुखी, ताप यासह त्वचेच्या विविध तक्रारींनी तोंड वर काढले आहे. ...
जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. त्यामुळे अंगदुखी, डोकेदुखी, ताप यासह त्वचेच्या विविध तक्रारींनी तोंड वर काढले आहे. या काळात उष्माघात, जंतुसंसर्ग, डायरिया, डिसेंट्री, कावीळ, टायफाईड, लहान मुलांमध्ये गोवर, कांजण्यांसह डोळ्यांचे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी घ्या, आहारात उन्हाळी फळे घ्या, जास्तीत जास्त द्रव आहार द्यावा. कडक उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडणे टाळा, असा सल्ला डाॅक्टरांकडून देण्यात येतो.
लघवीशी संबंधित तक्रारी
वाढत्या उन्हामुळे मुतखडा, लघवी मार्गाचा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. लघवीच्या वेळी जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून तीन ते चार वेळा लिंबू सरबत घ्या, नारळपाणी, कोकम सरबत घ्या, असा सल्लाही तज्ज्ञ देतात.