सूर्य ओकतोय आग!
By Admin | Published: April 16, 2017 09:39 PM2017-04-16T21:39:34+5:302017-04-16T21:39:34+5:30
अकोला- पश्चिम राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गत दोन दिवसांपासून पारा सातत्याने चढत असून, रविवारी अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले.
अकोला@ ४५ : उष्णतेच्या लाटेने नागरिकांची होरपळ
अकोला : एप्रिल महिन्याचा उत्तरार्ध सुरू होताच सूर्याने अक्षरश: आग ओकण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गत दोन दिवसांपासून पारा सातत्याने चढत असून, रविवारी अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. उष्णतेच्या लाटेने नागरिकांची होरपळ होत असून, आणखी दोन दिवस ही लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
यावर्षीचा उन्हाळा मागील सर्व विक्रम मोडीत काढणार, असा कयास हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. तो कयास आता खरा ठरताना दिसत असून, यावर्षी मार्च महिन्यातच पारा ४४ अंश सेल्सिअसवर गेला होता. मध्यंतरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४०-४२ अंश सेल्सिअसच्या घरात राहिले. गत चार दिवसांपासून मात्र उष्णतेची लाट पसरल्याने तापमापीतील पारा झपाट्याने वर सरकला आहे. शुक्रवारी अकोला शहराचे तापमान राज्यात सर्वाधिक ४४.५ अशं सेल्सिअस होते. शनिवारी ४४. ६ अंशांची नोंद झाली. रविवारी सूर्य आणखीनच तेजाळल्याने ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी दुपारी उन्हाची प्रखरता एवढी होती, की शहरातील रस्ते ओस पडल्याचे चित्र सगळीकडे दिसत होते. संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरिकांची होरपळ होत असून, उन्हाच्या दाहकतेने जीवाची काहिली होत आहे. आणखी काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याने पारा आणखी चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
बाजारपेठा सामसूम
उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक दुपारी १२ वाजेनंतर बाहेर पडेनासे झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे या कालावधीत रस्ते व बाजारपेठा निर्मनुष्य होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
पाऱ्याचा चढता आलेख
गुरुवार - ४४.१
शुक्रवार - ४४. ५
शनिवार - ४४.६
रविवार - ४५.०