अकोला : ‘सर्वोपचार’मध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित
By Atul.jaiswal | Published: April 4, 2018 03:14 PM2018-04-04T15:14:24+5:302018-04-04T15:14:24+5:30
अकोला : शहरासह जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सियसवर गेल्याने उष्माघाताची बाधा होण्याची शक्यता वाढल्याच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारपासून विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले.
अकोला : शहरासह जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सियसवर गेल्याने उष्माघाताची बाधा होण्याची शक्यता वाढल्याच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारपासून विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले. रुग्णालयातील ५, ६ आणि ९ क्रमांकांच्या वॉर्डमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
यावर्षीचा उन्हाळा उष्ण तापमानाचे मागील सर्व विक्रम मोडीत काढण्याचा कयास आहे. मार्च महिन्यातच तापमान ४२ अंशांवर गेले होते. आता एप्रिल महिना सुरू झाला असून, उन्हाची दाहकता वाढतच आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्वच उपाययोजना व सुविधा आहेत. वॉर्ड क्र. ६ मध्ये महिलांसाठी चार खाटांची सुविधा आहे, वॉर्ड क्र. ६ मध्ये पुरुषांसाठी चार खाटा आहेत, तर वॉर्ड क्र. ९ मध्ये विशेष उष्माघात कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षात सहा खाटांची सुविधा आहे. एवढेच नव्हे, तर हा कक्ष वातानुकूलित ठेवण्यात आला आहे. वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये कुलरची व्यवस्था आहे. अद्यापपर्यंत सर्वोपचार रुग्णालयात उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद नाही.
उन्हाची दाहकता लक्षात घेता, मंगळवारपासून रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.