परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांसाठी रविवारी लसीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:08 AM2021-06-12T11:08:48+5:302021-06-12T11:09:07+5:30

Corona Vaccination : जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच नोकरदारांसाठी रविवारी विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे

Sunday vaccinations for students, employees going abroad! | परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांसाठी रविवारी लसीकरण!

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांसाठी रविवारी लसीकरण!

Next

अकोला : शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी तसेच नोकरदारांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने परदेशात जाणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच नोकरदारांसाठी रविवारी विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम भरतीया रुग्णालयात सकाळी ९ ते ११ वाजताच्या सुमारास होणार असून, विद्यार्थ्यांनी सोबत येताना आवश्यक कागदपत्रे आणावीत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. नोकरी किंवा शिक्षणासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसोबतच नोकरदारवर्ग परदेशात जातात. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांना लसीकरणानंतरच परदेशात प्रवेश दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अशा लोकांसाठी रविवारी भरतीया रुग्णालयात कोविड लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाचे हे विशेष सत्र एकाच दिवसासाठी राहणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना थेट केंद्रावर सकाळी ९ ते ११ वाजताच्या सुमारास लस दिली जाणार आहे. त्यासाठी परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहे. महापालिका क्षेत्रासह अकोट, तेल्हारा, पातुर, बाळापूर, मूर्तिजापूर आणि बार्शिटाकळी तालुक्यातील लाभार्थ्यांना भरतीया रुग्णालयातच लस दिली जाणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

विद्यार्थ्यांसाठी परदेशातील महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे पत्र किंवा आयकार्ड, तसेच नोेकरदारांसाठी संबंधित कंपनीत नोकरी करत असल्याचा पुरावा असलेले पत्र आवश्यक राहील. शिवाय, व्हिसा आणि पासपोर्टदेखील सोबत ठेवणे गरजेचे राहील.

 

आतापर्यंत २५ विद्यार्थ्यांची नोंदणी

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या २५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ज्यांना नावे नोंदवावयाची आहेत, ते मुख्य डाकघर कार्यालयाच्या बाजूला असलेल्या आरसीएच कार्यालयात अग्रवाल व नाईकवाडे यांच्याकडे आपली नावे नोंदवू शकतात. सोबत आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. तसेच ज्यांना पूर्वनोंदणी शक्य नाही, त्यांना थेट लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध केली जाणार आहे.

 

परदेशात जाणाऱ्या व्यक्तींसाठी रविवारी विशेष सत्राचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत २५ जणांची नोंदणी केली आहे, मात्र ज्यांना पूर्वनोंदणी शक्य नाही त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लसीकरण केंद्रावर यावे. कागदपत्रांची तपासणी केल्यावर लस दिली जाईल.

- डॉ. अनुप चौधरी, लसीकरण समन्वयक, मनपा, अकोला

Web Title: Sunday vaccinations for students, employees going abroad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.